आठवड्याभरात नागपुरातील अवैध धंदे बंद करा : पोलीस आयुक्तांचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2020 11:26 PM2020-09-22T23:26:46+5:302020-09-22T23:29:43+5:30
शहरातील अवैध धंदे आठवड्याभरात बंद करण्यासंदर्भात पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले. पोलीस आयुक्तांच्या या निर्देशामुळे अधिकारी अलर्ट झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील अवैध धंदे आठवड्याभरात बंद करण्यासंदर्भात पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले. पोलीस आयुक्तांच्या या निर्देशामुळे अधिकारी अलर्ट झाले आहे.
पोलीस आयुक्तांनी गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांची मंगळवारी सायंकाळी एक तास बैठक घेतली. त्यांनी गुन्हे शाखेच्या कामकाजाची प्रशंसा केली. परंतु काही पोलीस ठाण्याच्या हद्दीत लपून अवैध धंदे सुरू आहे. त्यांना तात्काळ बंद करण्यात यावे. कुठल्याही परिस्थितीत अवैध धंदे सुरू राहणार नाही, याची जबाबदारी पोलीस ठाण्याचे ठाणेदार व गुन्हे शाखेची आहे. गुन्हे शाखा पोलीस ठाण्याच्या वर आहे. आयुक्तांच्या निर्देशानंतरही अवैध धंदे सुरू राहिल्यास त्याचे उत्तर ठाणेदारासह गुन्हे शाखेलाही द्यावे लागणार आहे. त्यासाठी एका आठवड्याची सवलत दिली आहे.
पोलीस आयुक्तांनी जुगार, सट्टा, दारू, रेती व मांस वाहतुकीवर अंकुश लावण्याचे निर्देश दिले. ते म्हणाले नागपुरात जुगार अड्डे नेहमीच चर्चेत असतात, याची माहिती आहे. अवैध धंद्याचे अड्डे संचालित करणाऱ्यांवर कारवाईचे निर्देश दिले. अवैध दारू प्रकरणात मोठ्या व्यापाऱ्यांवर कारवाई का करण्यात येत नाही, असाही सवाल त्यांनी उपस्थित केला. गुन्हेगारांचा आर्थिक स्रोत बंद करणे गरजेचे आहे. त्यामुळे ते पुन्हा उभे होऊ शकणार नाही, असे आयुक्त म्हणाले.