नदीत रसायनयुक्त पाणी सोडणे बंद करा!
By admin | Published: March 11, 2016 03:18 AM2016-03-11T03:18:05+5:302016-03-11T03:18:05+5:30
औद्योगिक वसाहतीतील बहुतांश कंपन्यांनी रसायनयुक्त पाणी शुद्ध करायला सुरुवात केली आहे.
नागरिकांची मागणी : बुटीबोरीच्या ठाणेदारांना निवेदन
बुटीबोरी : औद्योगिक वसाहतीतील बहुतांश कंपन्यांनी रसायनयुक्त पाणी शुद्ध करायला सुरुवात केली आहे. मात्र, सी.ई.टी.पी. नामक कंपनीचा प्लांट बंद असल्याने या कंपनीतील रसायनयुक्त पाणी कृष्णा व वेणा नदीत सोडले जात आहे. या प्रकाराला आळा घालण्याची मागणी स्थानिक व परिसरातील नागरिकांनी केली असून, ठाणेदार भारत ठाकरे यांना निवेदन दिले आहे.
सी.ई.टी.पी. कंपनीतील प्लांट १५ दिवसांपासून बंद असल्याने या कंपनीतील रसायनयुक्त पाणी परिसरातील वेणा व कृष्णा नदीत सोडले जात आहे. परिणामी, या नद्यांवर असलेल्या बुटीबोरी, छोटीबोरी, गणेशपूर, टाकळघाट, रुईखैरी या गावांमधील पाणीपुरवठा योजना प्रभावित झाल्या आहेत. नदीतील रसायनयुक्त पाणी प्यायल्याने जनावरांना विविध आजार जडायला सुरुवात झाली आहे. यासंदर्भात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार केली होती. त्यामुळे या मंडळाच्या अधिकाऱ्यांनी या प्रकाराची पाहणी केली. परंतु, संबंधित कंपनीवर कुठलीही कार्यवाही केली नाही. रसायनयुक्त पाणीमुळे नद्यांमधील पाणी दूषित होत आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. परिणामी, या प्रकाराला आळा घालण्याची मागणी नागरिकांनी या निवेदनात केली आहे. शिष्टमंडळात अनिस बावला, राजू गावंडे, विनोद लोहकरे, अविनाश गुर्जर, दिनेश काकपुरे, गंगाधर कातुरे, सागर मोहीतकर, गजानन बुटके, नासिर शेख, तुकाराम हुसुकले, बल्लू श्रीवास, संजय ठाकरे, सरफराज शेख, फारूक शेख आदींचा समावेश होता. (प्रतिनिधी)