विकासात अडथळे आणण्याचा प्रकार बंद करणार
By admin | Published: March 5, 2016 03:19 AM2016-03-05T03:19:02+5:302016-03-05T03:19:02+5:30
भाजपने शहर विकासाचा दहा वर्षाचा कार्यक्रम दिला होता. महापालिका निवडणुकीला दहा महिन्यांचाच कालावधी शिल्लक आहे.
बंडू राऊत : फाईल्सचा प्रवास कमी करण्यावर भर
नागपूर : भाजपने शहर विकासाचा दहा वर्षाचा कार्यक्रम दिला होता. महापालिका निवडणुकीला दहा महिन्यांचाच कालावधी शिल्लक आहे. त्यादृष्टीने नियोजन करून आश्वासन पूर्तीसाठी शिल्लक असलेली विकास कामे तातडीने मार्गी लावण्याचा प्रयत्न राहील. यात कोणतीही तडजोड नाही. काही शुल्लक त्रुटी काढून विकास कामात अधिकाऱ्यांकडून अडथळे आणण्याचा प्रकार बंद केला जाईल, असे स्थायी समितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष बंडू राऊ त यांनी शुक्र वारी स्पष्ट केले. स्थायी समिती अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
स्थायी समितीला दहा महिन्यांचाच कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे अर्थसंकल्प ३१ मार्चला सादर करून विकास कामे तातडीने सुरू करावी लागतील. निवडणुकीमुळे दोन महिन्यांचा कालावधी कमी मिळणार असल्याने अधिकाऱ्यांना दररोज एक तास अधिक क ाम करण्याचे आवाहन करणार आहे. यातून विकासाला गती मिळेल. विकास कामे तातडीने मार्गी लावण्यासाठी फाईल्सचा प्रवास कमी करावा लागेल. एकाच अधिकाऱ्यांकडे एकच फाईल अनेकदा जाते. यामुळे मंजुरीला विलंब होत असल्याने विकास कामावर परिणाम होत असल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रकाराला आळा बसावा. यासाठी आयुक्तांसोबत चर्चा करून मार्ग काढला जाईल. २०१७ सालातील निवडणूक डोळ्यापुढे ठेवून विकासाचे नियोजन करावे लागेल. सुरेश भट सभागृहाचे रखडलेले काम तातडीने पूर्ण केले जाईल. तसेच अंबाझरी टी-पॉर्इंट येथील स्वामी विवेकानंद यांचा भव्य पुतळा दोन महिन्यात उभारला जाईल. कस्तूरचंद पार्क येथे उंच राष्ट्रध्वज उभारण्याचे काम तातडीने केले जाईल. यासाठी आवश्यक असलेल्या परवानग्या मिळाल्या असल्याची माहिती राऊ त यांनी दिली. (प्रतिनिधी)