कुटूंबातील ज्येष्ठांची अवहेलना थांबवा : दत्ता मेघे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 11:40 PM2019-02-25T23:40:47+5:302019-02-25T23:42:51+5:30
कुटुंबातील ज्येष्ठ सदस्य, आईवडील यांना योग्य तो आदर द्यायलाच हवा. त्यांची छळवणूक आणि अवहेलना होता कामा नये, याची काळजी मुलांनी घ्यायला हवी, असे आवाहन ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष व माजी खासदार दत्ता मेघे यांनी केले. ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठानतर्फे आयोजित दक्षिण नागपुरातील ज्येष्ठ नागरिक मेळाव्यादरम्यान अध्यक्ष म्हणून ते बोलत होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कुटुंबातील ज्येष्ठ सदस्य, आईवडील यांना योग्य तो आदर द्यायलाच हवा. त्यांची छळवणूक आणि अवहेलना होता कामा नये, याची काळजी मुलांनी घ्यायला हवी, असे आवाहन ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष व माजी खासदार दत्ता मेघे यांनी केले. ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठानतर्फे आयोजित दक्षिण नागपुरातील ज्येष्ठ नागरिक मेळाव्यादरम्यान अध्यक्ष म्हणून ते बोलत होते.
आज ज्येष्ठ नागरिकांच्या अनेक समस्या आहेत. त्या सोडविण्यासाठी प्रतिष्ठान ज्येष्ठ नागरिक मंडळे आणि शासन यांच्यामधील दुवा म्हणून काम करण्याचा मी संकल्प केला आहे. शासनाने ज्येष्ठ नागरिकांसाठी साठ वर्षे मर्यादा ठरविणारा शासननिर्णय काढला. परंतु ‘एसटी’ सारख्या काही विभागात त्यावर अद्याप अंमलबजावणी झाली नाही. त्याबाबत संबधित विभागाकडे आम्ही पाठपुरावा करू, तसेच वेगवेगळ्या योजनांमध्ये ज्येष्ठ नागरिकांना मिळणारे निवृत्ती वेतन वाढवून देण्यात यावे यासाठीदेखील प्रयत्न करण्यात येतील. हल्ली ज्येष्ठ नागरिकांच्या कौटुंबिक छळाच्या आणि अवहेलनेच्या बातम्या वाचायला मिळतात. हा सामाजिक चिंतेचा विषय आहे. हे थांबले पाहिजे म्हणून समाजात विशेषत तरूण पिढीत सकारात्मक जागृतीची गरज आहे, असे प्रतिपादन दत्ता मेघे यांनी केले. या प्रसंगी फेसकॉम पूर्व विदभार्चे अध्यक्ष बबनराव वानखेडे यांनी राज्य शासनाच्या ज्येष्ठ नागरिक धोरणाचा आढावा घेतला. तर अॅड.अविनाश तेलंग यांनी ‘ईपीएस’चा प्रश्न चर्चला. यावेळी सुधाकर कोहळे अशोक मानकर, प्रतापसिंह चव्हाण, उमाताई पिंपळकर, कमलेश राठी, अविनाश घुशे, महमूद अंसारी यांनीदेखील मार्गदर्शन केले. प्रतिष्ठानचे सचिव डॉ.राजू मिश्रा यांनी प्रास्ताविक केले. रत्नाकर राऊत यांनी संचालन केले.