वानेरा येथील शाळेचे स्थानांतरण थांबवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:07 AM2021-07-15T04:07:13+5:302021-07-15T04:07:13+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क पारशिवनी : आदिवासीबहुल व दुर्गम भागातील गाव असलेल्या वानेरा (ता. पारशिवनी) येथील खासगी अनुदानित आदिवासी शाळा ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
पारशिवनी : आदिवासीबहुल व दुर्गम भागातील गाव असलेल्या वानेरा (ता. पारशिवनी) येथील खासगी अनुदानित आदिवासी शाळा पारशिवनी येथे स्थानांतरित करण्यात आली. यात विद्यार्थ्यांच्या पालकांना काेणतीही पूर्वसूचना न देताच थेट त्यांच्या हाती ‘टीसी’ दिले. त्यामुळे आता विद्यार्थ्यांनी कुठे प्रवेश घ्यावा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. शाळेचे स्थानांतरण करून विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ केला जात असल्याचा आराेप पालकांचा आहे. त्यामुळे पर्यायी व्यवस्था हाेईपर्यंत वानेरा येथील शाळेचे स्थानांतरण थांबवा, अशी मागणी करीत पालकांनी गुरुवारी (दि.१४) गटशिक्षणाधिकारी कार्यालयासमाेर ठिय्या आंदाेलन केले.
वानेरा येथे गेल्या कित्येक वर्षापासून महात्मा जाेतिबा फुले प्राथमिक शाळा आहे. नागपूर येथील संदीप शिक्षण संस्थेद्वारा संचालित या खासगी अनुदानित शाळेत इयत्ता पहिली ते सहावीपर्यंत वर्ग आहेत. या शाळेत २८ विद्यार्थी शिकत हाेते. या गावात जिल्हा परिषदेची शाळा नाही. मात्र वानेरा येथील ही शाळा पारशिवनी येथे स्थानांतरित केली जात आहे. यासाठी शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी शाळा स्थानांतरणाला तडकाफडकी परवानगी दिली आहे. ही परवानगी देताना आर्थिक व्यवहार करण्यात आल्याची चर्चा शिक्षण वर्तुळात रंगत आहे.
विशेषत: शाळा स्थानांतरणाची काेणतीही पूर्वसूचना पालकांना दिली नाही. २८ पालकांच्या हातात थेट टीसी देण्यात आले. शिवाय टीसीकरिता पालकांचा काेणताही अर्जसुद्धा नाही. वानेरा गावापासून नरहर हे गाव ३ कि.मी. आहे. त्यामुळे येथील विद्यार्थी हा प्रवास करणार कसा, हा प्रश्नच आहे. कारण हा रस्ता जंगलव्याप्त असून, तेथे वन्यप्राण्यांचा सतत राबता असताे.
त्यामुळे वानेरा येथे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची साेय हाेत नाही, ताेपर्यंत ही शाळा स्थानांतरित करू नये, या मागणीसाठी प्रहारचे जिल्हाप्रमुख रमेश कारामाेरे, गाेंडवाना गणतंत्र पार्टीचे हरीश उईके यांच्या नेतृत्वात पालकांनी पारशिवनी येथील गटशिक्षणाधिकारी कार्यालयाच्या आवारात पाच तास ठिय्या आंदाेलन केले. यावेळी गटशिक्षणाधिकारी कैलास लाेखंडे यांनी पर्यायी व्यवस्था हाेईपर्यंत वानेरा येथील शाळेचे इतरत्र स्थानांतरण करू नये, अशी शिफारस करणारे पत्र शिक्षणाधिकारी (प्राथमिक) व जिल्हा परिषदेकडे दिले. त्या पत्राची प्रत प्राप्त झाल्यानंतर आंदाेलन मागे घेण्यात आले. यावेळी रमेश कारामाेरे, हरीश उईके, धनराज मडावी, माजी जि. प. सभापती महेश बमनाेटे, सुकलाल मडावी, सलीम बाघाडे, आकाश दिवटे, चंद्रशेखर राऊत, राधेश्याम नखाते, माेहन लाेहकरे, शिवकुमार उईके, वंदना भलावी, शांताराम ढाेंगे, अभिषेक एकूनकर, राजेश पंधरे, बंडू कुमरे, रुपेश पाठक, सदाशिव धुर्वे, निकेश जनबंधू आदींसह पालक उपस्थित हाेते.
....
शाळेच्या बांधकामावर प्रश्नचिन्ह
पारशिवनी येथे प्रभाग १७ मध्ये या स्थानांतरित शाळेचे बांधकाम युद्धपातळीवर सुरू आहे. या बांधकामासाठी नगर पंचायतने परवानगी दिली काय, कधी दिली गेली, ही जागा अकृषक कधी करण्यात आली, असे प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहे. नगर पंचायतच्या कार्यक्षेत्रात गेल्या महिन्यापासून या शाळेचे बांधकाम सुरू आहे. त्यामुळे बांधकामाबाबत नगर पंचायत प्रशासन अनभिज्ञ आहे, असेही नाही. एरवी एखाद्या व्यक्तीला घराचे बांधकाम करायचे असल्यास कित्येक महिने नगर पंचायत कार्यालयाचे हेलपाटे मारावे लागतात. मग शाळेचे बांधकाम कसे सुरू आहे, असाही प्रश्न नागरिक विचारत आहेत.
140721\img-20210714-wa0027.jpg
आंदोलकांना प्रत देताना गटशिक्षणाधिकारी