अवैध दारू विक्री बंद करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:13 AM2021-08-18T04:13:37+5:302021-08-18T04:13:37+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क कुही : पाेलिसांच्या वरदहस्तामुळे मांढळ (ता. कुही) येथील गल्लीबाेळात माेहफूल व देशीदारूच्या अवैध विक्रीला उधाण आले ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
कुही : पाेलिसांच्या वरदहस्तामुळे मांढळ (ता. कुही) येथील गल्लीबाेळात माेहफूल व देशीदारूच्या अवैध विक्रीला उधाण आले आहे. त्यामुळे तरुणांमध्ये व्यसनाधिनता वाढत असून, महिलांना त्रास सहन करावा लागत असल्याने ही अवैध दारू विक्री तातडीने कायमची बंद करण्यात यावी, अशी मागणी महिलांनी केली असून, आंदाेलनाचा इशारा दिला आहे.
काेराेना संक्रमण काळात टाळेबंदीमुळे बहुतांश दुकाने बंद हाेती. काहींनी दुकाने सुरू करण्याचा प्रयत्न केला, तर पाेलिसांनी त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली. मात्र, या काळात अवैध दारू विक्री सुरूच हाेती. गावात अवैध दारू विक्री काेण व कशा पद्धतीने करते, याची पाेलिसांना माहिती आहे. वाॅर्ड क्रमांक-३ मध्ये भाऊराव डहारे यांच्या घरातून राेज अवैध दारू विक्री केली जात असल्याने येथील नागरिक त्रस्त झाले आहेत.
काेराेना काळात नाेकरी गमावलेल्या तरुणांना गावात सहज दारू उपलब्ध हाेत असल्याने ते व्यसनाधिन झाले आहेत. गावात सध्या किमान २० ठिकाणी अवैध दारू विक्री केली जाते. स्कूटर व माेटरसायकलवरून या दारूची पाेलिसांसमक्ष अवैध वाहतूक केली जाते. महिलांनी याबाबत पाेलीस हवालदार अरुण कावळे यांना माहिती दिली असता, त्यांनी याकडे दुर्लक्ष केले, असा आराेपही महिलांनी केला.
गावातील शांतता कायम ठेवण्यासाठी अवैध दारू विक्री कायमची बंद करण्याची मागणी ठाणेदार चंद्रकांत मदने यांना दिलेल्या निवेदनात महिलांनी केली आहे. शिष्टमंडळात धनश्री देशमुख, मंजुषा भुते, शोभा मारोडे, लीला ठवकर, बनाबाई आंबेकर, रंजू पंधरे, नंदा लांडगे, मंदा पाटणकर, शालू भोयर, मनोज पंचबुधे, पोलीस पाटील खुशाल डहारे यांच्यासह महिलांचा समावेश हाेता.
...
पाेलीस चाैकीचा उपयाेग काय?
मांढळ ही कुही तालुक्यातील माेठी बाजारपेठ आहे. या ठिकाणी कुही पाेलीस ठाण्यांतर्गत पाेलीस चाैकी तयार केली आहे. या चाैकीत एक सहायक पाेलीस निरीक्षक, दाेन हवालदार, दाेन शिपाई, हाेमगार्ड आदी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. देशीदारूचा पुरवठा परवानाधारक दुकानातून केला जाताे. या कर्मचाऱ्यांसमाेर गावात खुलेआम अवैध दारू विक्री केली जाते. त्यामुळे या पाेलीस चाैकीचा उपयाेग काय, असा प्रश्नही महिलांनी उपस्थित केला.
...