डेपोतून पुरवठा बंद; पंप कोरडे, ड्रायव्हर्सच्या शंकांचे निरसन करा; विदर्भ पेट्रोलियम डिलर्स असोसिएशन
By मोरेश्वर मानापुरे | Published: January 2, 2024 08:28 PM2024-01-02T20:28:59+5:302024-01-02T20:31:08+5:30
प्रशासनाने पुढाकार घ्यावा
नागपूर : तेल कंपन्यांच्या डेपोतून पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा होत नसल्याने नागपूर जिल्ह्यातील ३०० पंपांवर पेट्रोल आणि डिझेलचा साठा संपला आहे. ही स्थिती ट्रक आणि टँकरचालकांच्या आंदोलनामुळे निर्माण झाली आहे. पुरवठा सुरळीत झाल्यास पंप पुन्हा सुरू होतील, अशी ग्वाही विदर्भ पेट्रोलियम डिलर्स असोसिएशनचे अध्यक्ष अमित गुप्ता यांनी मंगळवारी परिषदेत दिली.
संप पंपचालकांचा नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. तिन्ही कंपन्यांच्या डेपोतून सोमवारी शहरात ८० टँकर तर मंगळवारी २० टँकरने पेट्रोलचा पुरवठा झाला. चर्चेतून तोडगा न निघाल्यास बुधवारी जिल्ह्यातील एकूण ३०० पंपांवर पेट्रोल आणि डिझेल विक्रीसाठी उपलब्ध राहणार नाही. सरकारकडून ड्रायव्हर संघटनांना काहीही आश्वासन न मिळाल्याने संप निवळण्याची काहीही चिन्हे दिसत नाहीत. सोशल मीडियातील चुकीच्या वृत्तामुळे ड्रायव्हरमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
गुप्ता म्हणाले, भारतीय न्याय संहिता सुधारणा विधेयक भारत राजपत्र राष्ट्रपती यांच्या स्वाक्षरीने २५ डिसेंबरला प्रकाशित झाले. तेव्हापासूनच विरोध सुरू झाला आहे. विरोधाचे प्रमुख कारण हे सोशल मीडियाद्वारे प्रकाशित करण्यात येणारी अर्धवट माहिती आहे. त्यामुळे सर्वच ड्रायव्हरच्या मनात भीतीचे वातावरण पसरल्याने सर्वांचा आंदोलनात सहभाग दिसत आहे. हा कायदा सर्वांसाठीच आहे. त्यामुळे भीती न बाळगता सर्व शंकांचे निरसन करून ड्रायव्हर्सनी कामावर परत यावे. याकरिता सरकारनेही पुढाकार घेऊन त्यांचे निरसन करावे. प्रशासन, तेल विपणन कंपन्या, डिलर्स, वाहतूकदार पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करीत असून नागरिकांनी संयम पाळावा, असे आवाहन गुप्ता यांनी केले. पत्रपरिषदेत हरजीतसिंग बग्गा, प्रणय पराते, जितेंद्र अग्रवाल, बबलू भाटिया, अनिरुद्ध देशमुख उपस्थित होते.