बाबासाहेबांना धोका देणाऱ्या प्रवृत्तींना थांबवा

By admin | Published: April 14, 2016 03:25 AM2016-04-14T03:25:09+5:302016-04-14T03:25:09+5:30

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेऊन चुकीचे काम करणाऱ्या प्रवृत्तींना लोकांनीच थांबवावे,

Stop the tendencies that threaten Babasaheb | बाबासाहेबांना धोका देणाऱ्या प्रवृत्तींना थांबवा

बाबासाहेबांना धोका देणाऱ्या प्रवृत्तींना थांबवा

Next

न्यायमूर्ती अरुण चौधरी : न्यायालयाच्या सुयोग इमारतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी जयंती साजरी
नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेऊन चुकीचे काम करणाऱ्या प्रवृत्तींना लोकांनीच थांबवावे, असे आवाहन पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अरुण चौधरी यांनी येथे केले.
न्यायालयाच्या सुयोग येथील इमारतीमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे उद्घाटन करताना ते बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्या. प्रसन्ना वराळे होते तर प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश पुष्पा गणेडीवाला यांची प्रमुख उपस्थिती होती.
न्या. चौधरी म्हणाले की, मी बाबासाहेबांच्या जीवनावर आधारित दीड तासाची डॉक्युमेंटरी फिल्म पाहिली, बाबासाहेबांना किती खडतर आयुष्य भोगावे लागले हे मला कळले. हा माहितीपट पाहाताना मला अक्षरश: दहा-पंधरा वेळा रडायला आले, असेही ते म्हणाले.
बाबासाहेबांनी राज्यघटनेत नमूद केलेल्या बंधूभावाचा आधार घेऊन आपण एका प्रकरणावर निर्णय दिल्याचेही चौधरी यांनी सांगितले. बाबासाहेबांचे विचार कसे अमलात आणावे, याचा वकिलांनी विचार करावा, असे आवाहनही त्यांनी केले.
‘पत्रकार’ या पैलूचाही
विचार केला पाहिजे
या कार्यक्रमाचे अध्यक्ष न्यायमूर्ती प्रसन्ना वराळे म्हणाले की, युगप्रवर्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विशिष्ट चौकटीत सीमीत करू नये, ते चांगले पत्रकार होते. त्यांच्या पत्रकारिता या पैलूकडेही लक्ष दिले पाहिजे. त्यांनी मूक नायक आणि बहिष्कृत भारत ही वृत्तपत्रे प्रकाशित केली होती. त्यांचे बहुतांश लिखाण हे इंग्रजीत आहे, परंतु ही वृत्तपत्रे मराठी भाषेत होती आणि त्यातील भाषा ही रोखठोक होती, असेही ते म्हणाले.
न्या. वराळे म्हणाले की, माझ्या कुटुंबाला बाबासाहेबांच्या सानिध्यात राहण्याचा योग मिळाला हा मोठा चमत्कार होता. आम्हाला त्यांना जवळून पाहता आले. बाबासाहेबांची प्रज्ञा आकाशापेक्षाही मोठी होती. ते चांगले अर्थशास्त्रज्ञ होते. पुन्हा विद्यापीठे त्यांच्या अर्थशास्त्राचा नव्याने अभ्यास करीत आहेत, असेही ते म्हणाले. या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलताना अ‍ॅड.नरेंद्र गोंडाणे म्हणाले की, बाबासाहेब आंबेडकर हे खरे थोर देशभक्त होते. त्यांनी देशाला एकता आणि अखंडतेच्या सूत्रात बांधले. आदिवासींना कायद्याचे संरक्षण दिले. महिलांना मताधिकार दिला. ओबीसींना घटनेतील कलम ३४० चा आधार दिला. त्यामुळेच त्यांना आरक्षण मिळाले. अ‍ॅड. आर. एच. चिमूरकर म्हणाले की, बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानानुसार आचरण केले तर निश्चितच संविधानिक संस्कृती निर्माण होईल.
बाबासाहेबांनी राज्य घटना लिहिली त्यात कोणत्याही सूडाची भावना नव्हती. बाबासाहेब राज्य घटनेच्या रूपात अमृतच सोडून गेले. वैश्विक मूल्य जपणारी , माणसाला माणूस समजण्याचे आणि नवराष्ट्र निमिर्तीचे तत्त्वज्ञान देणारी ही घटना आहे, असेही ते म्हणाले. यावेळी जिल्हा न्यायालयाच्या प्रधान जिल्हा न्यायाधीश पुष्पा गणेडीवाला, अ‍ॅड. श्यामनयन अभ्यंकर यांनीही विचार व्यक्त केले. प्रास्ताविक महाराष्ट्र गोवा बार कौन्सिलचे माजी उपाध्यक्ष अ‍ॅड. अनिल गोवारदिपे यांनी केले. संचालन अ‍ॅड. वैभव उगले आणि अ‍ॅड. उज्ज्वला ठाकरे यांनी तर आभार प्रदर्शन अ‍ॅड. प्रकाश ढोके यांनी केले.
या प्रसंगी अतिरिक्त सत्र न्यायाधीश विजयकुमार शुक्ला, प्रमुख जिल्हा सरकारी वकील विजय कोल्हे, अ‍ॅड. योगेश मंडपे, सरकारी वकील प्रशांत भांडेकर, अ‍ॅड. बी. एम. करडे, अ‍ॅड. शैलेश नारनवरे, अ‍ॅड. भुजंगराव रायपुरे उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे आणि अर्धपुतळ्याचे अनावरण करण्यात आले. (प्रतिनिधी)

Web Title: Stop the tendencies that threaten Babasaheb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.