उपराजधानीत काँग्रेसचा रास्ता रोको
By admin | Published: November 3, 2016 03:31 AM2016-11-03T03:31:29+5:302016-11-03T03:31:29+5:30
वन रॅँक वन पेन्शन (ओआरओपी) च्या मुद्यावर काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना झालेल्या अटकेचे तीव्र
राहुल गांधींच्या अटकेचे पडसाद : सीताबर्डीतील वाहतूक तासभर ठप्प
नागपूर : वन रॅँक वन पेन्शन (ओआरओपी) च्या मुद्यावर काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना झालेल्या अटकेचे तीव्र पडसाद बुधवारी नागपुरात उमटले. शहर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात तीव्र संताप व्यक्त करीत व्हेरायटी चौकात चक्काजाम केला. कार्यकर्त्यांनी काही स्टारबसेस व एसटी बसेस फोडण्याचा प्रयत्न केला. जवळपास तासभर चाललेल्या या आंदोलनामुळे सीताबर्डी चौकातील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली. आंदोलनादरम्यान पोलीस मात्र निष्प्रभ झाल्याचे दिसत होते.
ओआरओपीच्या मागणीसाठी माजी सैनिक रामकिसन ग्रेवाल यांनी बुधवारी आत्महत्या केली. मृताच्या भेटीला जात असलेल्या राहुल गांधी यांना दिल्ली पोलिसांनी अटक केली. या घटनेचा तीव्र असंतोष काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये पसरला. नागपुरात माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, काँग्रेस शहराध्यक्ष विकास ठाकरे, उमाकांत अग्निहोत्री यांच्या नेतृत्वात व्हेरायटी चौकात आंदोलन केले. काँग्रेस कार्यकर्त्यांनी रास्ता रोकोचा प्रयत्न केला तसा आंदोलनाला उग्र रूप प्राप्त झाले. कार्यकर्त्यांनी वाहतूक थांबविण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान चौकातून स्टारबस चालकाने गाडी काढण्याचा प्रयत्न करताच कार्यकर्त्यांनी गाडीवर चढून चालकाला बाहेर काढले. काहींनी गाडी फोडण्याचाही प्रयत्न केला. त्यानंतर इतर सिग्नलवरून निघणाऱ्या स्टारबस, एसटी बसेस गाड्यांनाही थांबविण्यात आले. याचवेळी कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान पोलिसांशी झटापटही झाली. कार्यकर्ते या सिग्नलवरून त्या सिग्नलवर धावत जाऊन वाहतूक थांबविण्याचा प्रयत्न करीत होते. यावेळी नेते, कार्यकर्ते यांनी चौकात गोल मानवी साखळी तयार करून आंदोलन केले. प्रधानमंत्री व भाजपा सरकारच्या विरोधात यावेळी तीव्र नारेबाजी करण्यात आली. जवळपास तासभर हे आंदोलन नाट्य सीताबर्डी चौक ात सुरू होते.
या सर्व आंदोलनादरम्यान पोलीस मात्र हतबल झाल्याचे दिसून येत होते. सैरभैर आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना रोखण्यात पोलिसांचे बळ कुचकामी ठरले.
युवक काँग्रेसनेही जाळला मोदींचा पुतळा
दुसरीकडे युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनीही सीताबर्डी चौकात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुतळा जाळून भाजपा सरकारविरोधात तीव्र घोषणाबाजी केली. युवक काँग्रेस शहर अध्यक्ष बंटी शेळके यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी इटर्निटी मॉलसमोर पुतळादहन व घोषणाबाजी करून सरकारचा निषेध केला. त्यानंतर सीताबर्डी पोलिसांनी सर्व कार्यकर्त्यांना अटक केली. आंदोलनात प्रशांत तन्हेरवार, रोहित खैरवार, स्वप्नील बावनकर, हेमंत कातुरे, आसीफ शेख, अथर्व पोहनकर, स्वप्निल ढोके, समीर काळे, राम पऱ्हाटकर, सौरभ शेळके आदी कार्यकर्त्यांचा समावेश होता.