विदर्भवाद्यांची रास्ता रोको, जेलभरोची तयारी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:09 AM2021-08-22T04:09:29+5:302021-08-22T04:09:29+5:30
नागपूर : वेगळ्या विदर्भ राज्याची निर्मिती आणि कोरोना काळातील वीज बिल माफी या मागणीसाठी २६ ऑगस्टला होणाऱ्या आंदोलनासाठी विदर्भवाद्यांचे ...
नागपूर : वेगळ्या विदर्भ राज्याची निर्मिती आणि कोरोना काळातील वीज बिल माफी या मागणीसाठी २६ ऑगस्टला होणाऱ्या आंदोलनासाठी विदर्भवाद्यांचे नियोजन सुरू झाले आहे. स्वतंत्र विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या नेतृत्वात हे आंदोलन होऊ घातले असून, विदर्भात १०० ठिकाणी रास्ता रोको आणि चक्का जाम करण्याचा इशारा विदर्भवाद्यांनी दिला आहे. या आंदोलनादरम्यान नागपूर शहरात गणेशपेठ बसस्थानकासमोर दुपारी १२ वाजता हे आंदोलन केले जाणार आहे. यासोबतच नागपुरातील सर्व तालुका मुख्यालयावर आणि महत्त्वाच्या मार्गावरही हे आंदोलन केले जाणार आहे. मागील आठवड्यात क्रांतिदिनापासून तर स्वातंत्र्यदिनापर्यंत विदर्भवाद्यांनी पहिल्या टप्प्यात ठिय्या आंदोलन केले होते. आंदोलनाचा दुसरा टप्पा रास्ता रोको आणि जेल भरो आंदोलनाने प्रारंभ होणार असल्याचे आंदोलन समितीचे मुख्य संयोजक राम नेवले यांनी सांगितले.
आंदोलनाच्या यशस्वीतेसाठी नेते आणि कार्यकर्त्यांच्या बैठका सुरू आहेत. २० ऑगस्टला सायंकाळी समितीच्या मुख्य कार्यालयात गिरीपेठ येथे बैठक झाली. विदर्भातील सर्वच जिल्हा मुख्यालयी आणि तालुका मुख्यालयी कार्यकर्त्यांच्या बैठका सुरू आहेत. पूर्व विदर्भात माजी आमदार ॲड. वामनराव चटप तर पश्चिम विदर्भात राम नेवले जनसंपर्क साधत आहेत.
...
आंदोलन गाव-मोहल्ल्यात पेटविणार - राम नेवले
राम नेवले म्हणाले, आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यातून बरेच बळ आले आहे. दुसरा टप्पा यशस्वी होईल, असा विश्वास आहे. विदर्भ राज्याच्या मागणीसाठी होणाऱ्या आंदोलनात कायदा तोडून हजारो कार्यकर्ते अटक करवून घेतील. हे आंदोलन शहर ते गाव मोहल्ल्यापर्यंत पेटविणार असून प्रश्न सुटल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे ते म्हणाले.
...