एकाच दिवशी थांबविले २ बालविवाह, पोलिसांसह बाल संरक्षण कक्षाचे पथक पोहचल्याने उडाली खळबळ
By मंगेश व्यवहारे | Published: April 24, 2023 05:30 PM2023-04-24T17:30:35+5:302023-04-24T17:35:07+5:30
दुपारी ३ वाजता होता मुहुर्त, त्यापूर्वीच थांबविला प्रकार
नागपूर : सोमवारी दुपारी ३ वाजता लग्नाचा मुहुर्त होता. घरापुढे मंडप टाकलेला होता. आचारी स्वयंपाकात गुंतले होते. मुलगा व मुलीला हळद लावण्यात आली होती. घरात सर्व लगबग सुरू असताना जिल्हा बाल संरक्षण अधिकारी व पोलीसांचे पथक लग्नमंडपात धडकले आणि लग्न मंडळात चांगलीच खळबळ माजली. एकाच घरातील भाऊ व बहिणीचे लग्न दुसऱ्या कुटुंबातील भाऊ बहिणीशी होणार होते. यातील एक वधू व एक वर अल्पवयीन होता. जिल्हा बाल संरक्षण पथकाने एकाच दिवशी होणारे दोन्ही बाल विवाह थांबविले.
नागपूर जिल्ह्यातील बोकारा येथील छत्तरपुर येथे वडार समाजाची वस्ती आहे. या वस्तीमध्ये हे बाल विवाह होणार होते. यासंदर्भातील माहिती जिल्हा महिला व बाल विकास विभागाला मिळाली. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अपर्णा कोल्हे यांनी बाल संरक्षण अधिकारी मुश्ताक पठाण यांच्या नेतृत्वात पथक गठित करून सोमवारी सकाळीच लग्नस्थळावर पाठविले.
एकाच घरी भाऊ व बहिणीचा दुसऱ्या नात्यातील भाऊ बहिणी सोबत बालविवाह होणार होता. दोघांचेही बाल विवाह प्रतिबंधक कायद्या २००६ अन्वये लग्नाचे वय झालेले नव्हते. या करीता मुलगा व मुलीच्या वयाचे दाखले घेण्यात आले. लग्नाचे वय नसल्याने बालविवाह प्रतिबंधक कायदा २००६ अन्वये मुलगा व मुलगी यांचे आई-वडील कुडून हमीपत्र घेण्यात आले. यातील एक मुलगी व एक मुलगा अल्पवयीन होता. कायद्यानुसार त्यांचे लग्नाचे वय झालेले नव्हते. या कारवाईत संरक्षण अधिकारी विनोद शेंडे, साधना हटवार, पोलीस उपनिरीक्षक राजेश खंडाळकर, प्रकल्प अधिकारी मनिषा बुरचूंडी, पर्यवेक्षक शर्मिला जाधव, सरपंच भाऊराव गोमासे, उपसरपंच अब्दूल वहिद, ग्रामसेवक ज्ञानेश्वर नेहारे, विश्वास सोमकुवर, अमित तिवारी उपस्थित होते.
- हळद लागलेली मुलगी बाल कल्याण समिती समक्ष
ज्या अल्पवयीन मुलीचा विवाह होत होता. तिचे कागदपत्रानुसार वय कमी असल्याने तिला काळजी व संरक्षणाच्या दृष्टीकोनातून पोलीसांच्या माध्यमातून बाल कल्याण समितीच्या समक्ष हजर करण्यात आले. बाल कल्याण समितीने पालकांकडून हमीपत्र लिहून घेतले.