४० हजार मागासवर्गीय कर्मचाऱ्यांची पदोन्नती थांबवली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2019 10:46 PM2019-09-14T22:46:56+5:302019-09-14T22:51:26+5:30
महाराष्ट्र सरकारने गेल्या दीड वर्षांत मागासवगीर्यांच्या ४० हजार कर्मचाऱ्यांची पदोन्नती थांबवली आहे. सरकारने सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या शपथपत्रातच याचा उल्लेख केल्याची माहिती स्वतंत्र्य मजदूर युनियनचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.एस. पाटील यांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महाराष्ट्र सरकारने गेल्या दीड वर्षांत मागासवगीर्यांच्या ४० हजार कर्मचाऱ्यांची पदोन्नती थांबवली आहे. सरकारने सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या शपथपत्रातच याचा उल्लेख केल्याची माहिती स्वतंत्र्य मजदूर युनियनचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.एस. पाटील यांनी दिली. एका कार्यक्रमात ‘मागासवर्गीय कर्मचारी, अधिकारी यांचे पदोन्नती धोरण आणि पुढील दिशा’ या विषयावर ते बोलत होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कामगार प्रशिक्षण केंद्र, हजारी पहाड, प्रेरणा नगर येथे संघटन सचिव गणेश उके आणि त्यांच्या पत्नी वनमाला उके यांचा सत्कार सोहळा नुकताच आयोजित करण्यात आला. व्यासपीठावर आमदार डॉ. मिलिंद माने, विकास गौर, सतीश ओटके होते. जे.एस. पाटील यांनी सांगितले, महाराष्ट्र सरकारने २९ डिसेंबर २०१७ ला परिपत्रक काढले. त्यानुसार अनुसूचि जाती आणि जमातीच्या कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्याचे थांबण्यात आले. मात्र, खुल्या प्रवर्गातील कर्मचाऱ्यांना पदोन्नती दिली जात आहे. विशेष म्हणजे मागावर्गीय कर्मचाऱ्यांची पदोन्नती थांबणारे आणि खुल्या प्रवर्गाला पदोन्नती आरक्षण देणारे महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या शपथपत्रात २९ डिसेंबर २०१७ ते २९ मे २०१९ पर्यंत ४० हजार मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आले नसल्याचे नमूद केले आहे. या सरकारी कर्मचाऱ्यांसह महामंडळातील सुमारे २० हजार कर्मचारी पदोन्नतीपासून वंचित झाले असूल अशाप्रकारे ६० कर्मचारी पदोन्नतीतील आरक्षणपासून वंचित आहेत, असेही ते म्हणाले.
सत्काराला उत्तर देताना गणेश उके म्हणाले, ही लढाई केवळ आरक्षणाची नाहीतर सामाजिक आहे. आपण फक्त कर्मचारी, अधिकाऱ्यांचेच हित बघत नाही तर गवंडी कामगार, अंगणवाडी सेविका, शेतमजूर, पेट्रोल पम्प, सुरक्षा रक्षक, संघटित, असंघटित कामगारांसाठी देखील काम करतो. ही संघटना समानतेच्या तत्त्वावर चालते. या संघटनेत सर्व कर्मचारीवर्ग समान आहेत, असेही संघटन सचिव गणेश उके म्हणाले. डॉ. मिलिंद माने यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक एन.बी. जारोंडे यांनी तर संचालन वाय.के. कांबळे यांनी केले. दिनेश बोरकर यांनी आभार मानले.