१५ रुपयांत 'क्लॉक रूम'मध्ये सामान ठेवा अन् निर्धास्त व्हा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2023 08:06 PM2023-02-25T20:06:46+5:302023-02-25T20:07:14+5:30
Nagpur News रेल्वेस्थानकावर केवळ १५ रुपये द्या. सोबत तुमचे कपडे आणि किमती सामानाची बॅग कंत्राटदाराच्या माणसाला सोपवा अन् बिनधास्त व्हा. कारण पुढचे २४ तास तो तुमच्या किमती सामानाची देखभाल करणार आहे.
नागपूर : रेल्वेस्थानकावर केवळ १५ रुपये द्या. सोबत तुमचे कपडे आणि किमती सामानाची बॅग कंत्राटदाराच्या माणसाला सोपवा अन् बिनधास्त व्हा. कारण पुढचे २४ तास तो तुमच्या किमती सामानाची देखभाल करणार आहे. होय, रेल्वेस्थानकावर आठवडाभरानंतर ही सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.
अनेक प्रवासी महत्त्वाच्या कामानिमित्त एकटेच प्रवास करतात. अनेकदा सोबत असलेली बॅग व इतरही साहित्य घेऊन फिरणे शक्य होत नाही. एकट्या महिला प्रवाशांसाठी तर ते कठीणच असते. रेल्वेस्थानकावर आल्यानंतर भूक लागली किंवा नैसर्गिक विधीसाठी जायचे म्हटले तर आपली बॅग कुणाच्या भरवशावर सोडावी, असा प्रश्न असतो. कारण प्रवाशांच्या सामानावर हात मारण्यासाठी चोर-भामटे टपूनच असतात. कुणाच्या गाडीला विलंब असला, थकल्यामुळे त्याला झोप येत असेल तर त्याला सामानाच्या सुरक्षेची चिंता सतावते.
अशावेळी रेल्वेस्थानकावरील 'क्लॉक रूम' एकमेव आधार असते. मुख्य रेल्वेस्थानकावर रेल्वेगाड्या अन् प्रवाशांची २४ तास असलेली वर्दळ लक्षात घेता येथील क्लॉक रूमसह प्रवाशांच्या सामानाच्या देखभालीची जबाबदारी कंत्राटदाराकडे सोपविण्यात आली आहे. फलाट क्रमांक एक जवळच ही क्लॉक रूम असेल. तेथे आपली बॅग प्रवासी ठेवू शकेल. एका बॅगमधील सामानासाठी अवघे १५ रुपये घेऊन कंत्राटदाराचा कर्मचारी पुढचे २४ तास त्या बॅगची देखभाल करणार आहे. पुढच्या प्रत्येक तासासाठी १५ रुपये घेतले जाईल, असेही या संबंधाने बोलताना रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी विजय थुल यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
पाच रुपयांत डिजिटल लॉकर
रेल्वे प्रवाशांना याच क्लॉक रूममध्ये डिजिटल लॉकरची सुविधा देण्यात येईल. त्यात मोबाईल तसेच अन्य माैल्यवान वस्तू प्रवासी ठेवू शकेल. त्याचा पीन किंवा चावी संबंधित प्रवाशाजवळ राहील अन् त्यासाठी केवळ पाच रुपये शुल्क आकारले जाईल.
हैदराबादच्या कंपनीला कंत्राट
नुकताच हैदराबाद येथील कंपनीसोबत दोन वर्षांसाठी हा करार करण्यात आला आहे. त्यासाठी कंपनीकडून रेल्वे प्रशासन दरवर्षी ७.९ लाख रुपये घेणार आहे. येत्या ६ मार्चपासून ही सुविधा सुरू होण्याची शक्यता आहे.
----