सर्वसामान्यांच्याच कथा आयुष्य बदलवू शकतात
By admin | Published: April 11, 2016 03:13 AM2016-04-11T03:13:42+5:302016-04-11T03:13:42+5:30
साधारणत: सेलिब्रिटींच्या कथा आणि त्यांचा संघर्ष सामान्य माणसांना सांगितला जातो आणि त्यावर पुस्तकेही येतात.
संदीपकुमार साळुंखे : प्रयास सेवांकुरतर्फे ‘अलग राह’ उपक्रमात रौप्य महोत्सवी मुलाखत
नागपूर : साधारणत: सेलिब्रिटींच्या कथा आणि त्यांचा संघर्ष सामान्य माणसांना सांगितला जातो आणि त्यावर पुस्तकेही येतात. काही लोकांच्या आयुष्यात खरेच संघर्ष असतोही पण त्या कथा सामान्य गरीब युवकांना प्रेरित करीत नाही. कारण त्यांचे जीवन वेगळे असते. त्यापेक्षा सर्वसामान्य नागरिकांनी संघर्षातून मिळविलेले यश आपल्याला अधिक जवळचे वाटते कारण यश मिळविणाराही आपल्यातलाच कुणीतरी असतो.
एखाद्या व्यक्तीला यशाचा हा टप्पा गाठता आला तर आपणही तो गाठू शकतो, याचा विश्वास सामान्यांच्या यशातून येतो आणि आपले आयुष्य बदलते, असे मत संयुक्त आयकर आयुक्त संदीपकुमार साळुंखे यांनी व्यक्त केले.
प्रयास, सेवांकुरचे अमरावती येथील संस्थापक डॉ. अविनाश सावजी यांनी ‘अलग राह’ हा वेगळ्या वाटांनी यशस्वी होणाऱ्या मान्यवरांच्या मुलाखतीचा उपक्रम सुरू केला.
या मालिकेतला हा रौप्य महोत्सवी कार्यक्रम आज चिटणवीस सेंटर, सिव्हिल लाईन्स येथे आयोजित करण्यात आला. याप्रसंगी अविनाश सावजी यांनी मुलाखतीद्वारे संदीपकुमार साळुंखे यांचा प्रवास उलगडला. साळुंखे युवा अधिकारी आहेत.
प्रामाणिक आणि सक्रिय प्रशासकीय अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांचा व्यक्तिगत प्रवासही प्रेरणात्मक आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारा आहे. याप्रसंगी त्यांनी शिक्षण घेताना करावा लागलेला संघर्ष आणि प्रतिकुलतेतून त्यांनी कसा मार्ग शोधला, याची अनेक उदाहरणे सांगितलीत. अभिनिवेश न बाळगता सहजपणे आपला प्रवास सांगताना त्यांनी युवा विद्यार्थ्यांना लढण्याची जिद्द दिली.
आपण लहानपणापासून सामान्य वातावरणात वाढलो. घरात सुबत्ता नव्हती त्यामुळे अभ्यास करून घरातही हातभार लावायचा, हा संस्कार मनावर झाला. यातून बरेच काही शिकता आले. त्यामुळेच माझी ओळख माझे गाव असल्याचा अभिमान त्यांनी व्यक्त केला. तारुण्यात एखाद्या मोहाला आपण सहजपणे बळी पडतो आणि त्यातून आजारपण येऊ शकते. याचा अनुभवही त्यांनी सहजपणे सांगितला. चुकण्यापेक्षाही पुन्हा चूक न करणे आणि सुधार करीत राहणे महत्त्वाचे आहे, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)