पंजाबराव देशमुख यांच्या पुतळ्यावरून वादळ
By admin | Published: March 21, 2017 01:45 AM2017-03-21T01:45:21+5:302017-03-21T01:45:21+5:30
महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या सेमिनरी हिल्स येथील महाविद्यालयातील दर्शनी भागातील डॉ. पंजाबराव देशमुख यांचा पुतळा हटविल्यावरून सध्या जोरदार वादळ उठले आहे.
मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड आक्रमक : सहयोगी अधिष्ठात्यांना निवेदन, तीव्र आंदोलनाचा इशारा
नागपूर : महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या सेमिनरी हिल्स येथील महाविद्यालयातील दर्शनी भागातील डॉ. पंजाबराव देशमुख यांचा पुतळा हटविल्यावरून सध्या जोरदार वादळ उठले आहे. मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड व वीर भागतसिंग विद्यार्थी परिषदेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी सोमवारी पशुवैद्यकीय महाविद्यालयावर धडक देऊन या घटनेचा तीव्र निषेध केला.
शिवाय पुतळा पूर्ववत जागी स्थापित करण्याच्या मागणीसह महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. एन. पी. दक्षिणकर यांना निवेदन दिले. मराठा सेवा संघाचे अध्यक्ष दिलीप खोडके यांच्या मते, येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयात प्रथम दर्शनीय भागात डॉ. पंजाबराव देशमुख यांचा पुतळा स्थापित होता. परंतु नुकत्याच काही दिवसांपूर्वी येथील सभागृहाच्या नूतनीकरणाच्या नावाखाली तो पुतळा हटवून, बाजूला एका कोपऱ्यात स्थापित करण्याचा घाट रचला जात आहे. हा डॉ. पंजाबराव देशमुख यांचा अवमान आहे. डॉ. देशमुख देशाचे प्रथम कृषिमंत्रीच नव्हे तर बहुजन समाजाचे प्रेरणास्थान आहे. त्यामुळे त्यांचा पुतळा पूर्ववत दर्शनी स्थळी स्थापित करावा, अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा यावेळी मराठा सेवा संघाचे खोडके यांच्यासह जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्षा सुनीता जिचकार यांनी दिला. दरम्यान, डॉ. दक्षिणकर यांनी पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या आगामी सभेत हा विषय सादर करून त्यावर योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले असल्याची माहिती खोडके यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. यावेळी संभाजी ब्रिगेडचे चंद्रशेखर येवले, रितेश पांडे, प्रमोद वैद्य, पंकज निंबाळकर, आनंद देशमुख, उत्तम सुळके, स्वप्निल साखरे, राहुल कोल्हे, शिवा घोरपडे, साहिल साबळे, रितेश राऊत, राजा जोश, राजू सोनटक्के, राहुल येवले, मनीष येवले, नंदा देशमुख, जया देशमुख, सुषमा साबळे, अनिता ठेंगरे, सीता टालाटुले व वर्षा ठेंगरे उपस्थित होते. (प्रतिनिधी)