वादळ ‘वार’
By admin | Published: May 29, 2017 02:48 AM2017-05-29T02:48:15+5:302017-05-29T02:48:15+5:30
दोन महिन्यापासून उन्हाच्या झळा सोसणाऱ्या नागपूरकरांना रविवारी सायंकाळच्या सुमारास वादळाचा तडाखा बसला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दोन महिन्यापासून उन्हाच्या झळा सोसणाऱ्या नागपूरकरांना रविवारी सायंकाळच्या सुमारास वादळाचा तडाखा बसला. ताशी ७० ते ८० किलोमीटर वेगाच्या वाऱ्यामुळे सर्वत्र धुळीचे वातावरण निर्माण झाले. शहरात विविध भागात ३५ ते ४० झाडे पडली. मोठमोठे होर्डिंग उडाले. वीजतारा तुटल्या तसेच वीज खांब कोसळल्याने शहराच्या बहुसंख्य भागातील वीज पुरवठा खंडित झाला. यामुळे अंधारचे साम्राज्य होते. सीए रोडच्या बाजूच्या ट्रान्सफार्मरला आग लागली. वादळामुळे नागपूर शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या नवेगाव खैरी पंपिंग स्टेशनचा वीज पुरवठा बंद पडला. यामुळे सोमवारी शहराच्या अनेक भागाला पाणी मिळणार नाही. रात्री ८.३० पर्यंत नागपूर शहरात २५.२ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली.
अर्धे शहर अंधारात
रविवारी सायंकाळी आलेल्या वादळाचा स्पॅन्को नागपूर डिस्कॉम लिमिटेडच्या (एसएनडीएल) तब्बल १२ फिडरला तडाखा बसला. याशिवाय महावितरणचीसुद्धा संपूर्ण वीज यंत्रणा कोलमडून पडली होती. यामुळे अर्ध्यापेक्षा अधिक शहर अंधारात बुडाले होते. महावितरणच्या रामदासपेठ, धंतोली व छत्रपतीनगरसह एसएनडीएलच्या अधिकार क्षेत्रातील वर्धमाननगर, इतवारी, सीए रोड, मेडिकल, सिव्हिल लाईन्स, सेमिनरी हिल्स, हजारी पहाड व वंजारीनगर परिसरातील संपूर्ण वीज पुरवठा ठप्प झाला होता.
यात एसएनडीएलचे वर्धमाननगर येथील ३३ केव्हीचे सबस्टेशन डाऊन झाले होते. याशिवाय सेमिनरी हिल्स येथील फीडरवरून हजारी पहाड परिसरात होणारा वीज पुरवठा पूर्णत: खंडित झाला होता. जोराच्या वादळामुळे अनेक ठिकाणी सर्व्हिस केबल तुटले आहेत. त्याचाही वीज ग्राहकांना फटका सहन करावा लागला. ही विस्कळीत झालेली संपूर्ण वीज यंत्रणा पूर्ववत करण्यासाठी एसएनडीएलची दीडशे कर्मचाऱ्यांची फौज रात्री उशिरापर्यंत युद्धपातळीवर काम करीत होती. यात त्यांना काही फिडर दुरुस्ती करण्यात यश मिळाले होते. परंतु वर्धमाननगर, मेडिकल आणि हजारी पहाड परिसरातील वीज पुरवठा रात्री उशिरापर्यंत सुरू झालेला नव्हता.
वीज कोसळून तरुणाचा मृत्यू
जोरात कडाडलेली वीज झाडावर कोसळल्याने त्या झाडाखाली उभ्या असलेल्या तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना कुही तालुक्यातील बोरी (सदाचार) शिवारात रविवारी सायंकाळी ६.४५ वाजताच्या सुमारास घडली. सचिन रामदास वाढवे (२२, रा. बोरी-सदाचार, ता. कुही) असे मृत तरुणाचे नाव आहे. सचिन बकऱ्या चारण्यासाठी बोरी (सदाचार) शिवारात गेला होता. त्याच्यासोबत त्याचे दोन मित्रही होते. सायंकाळी पावसाला सुरुवात झाल्याने तो या शिवारातील संतोष भोतमांगे यांच्या शेतातील झाडाखाली उभा राहिला. त्यातच जोरात कडाडलेली वीज थेट झाडावर कोसळली. त्यात गंभीर इजा झाल्याने त्याला लगेच मांढळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले. तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
बालिका जखमी
जोरात कडाडलेली वीज कोसळल्याने परिसरात खेळत असलेली सात वर्षीय बालिका जखमी झाली. ही घटना काटोल शहरातील रेल्वेस्थानक परिसरात रविवारी सायंकाळी घडली. माही शेंडे (७, रा. रेल्वेस्थानक परिसर, काटोल) असे जखमी बालिकेचे नाव आहे. ती नेहमीप्रमाणे तिच्या घराच्या परिसरात खेळत होती. त्याचवेळी वादळासह पावसाला सुरुवात झाली. दरम्यान, जोरात कडाडलेली वीज तिच्या घराच्या परिसरात कोसळली. त्यात माहीला इजा झाली. ही बाब लक्षात येताच तिला लगेच शहरातील खासगी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. डॉक्टरांनी उपचार करून तिला सुटी दिली.