७ ते ९ जानेवारीदरम्यान विदर्भात पुन्हा वादळी पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2020 11:00 AM2020-01-06T11:00:17+5:302020-01-06T11:00:36+5:30
येत्या ७ ते ९ जानेवारीदरम्यान नागपूरसह विदर्भात पुन्हा वादळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : येत्या ७ ते ९ जानेवारीदरम्यान नागपूरसह विदर्भात पुन्हा वादळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तसेच नागपुरात मागील दोन दिवसात पारा पुन्हा घसरला असून थंडी कायम आहे. इंग्लंडमधील रेडींग विद्यापीठातील हवामान अभ्यासक अक्षय देवरस यांनी हा अंदाज व्यक्त केला आहे. ७ ते ९ दरम्यान नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्र्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील बऱ्याच भागात, तर अमरावती, यवतमाळ, नांदेड, अकोला, वाशीम आणि बुलडाणा जिल्ह्यातील काही भागात (प्रामुख्याने पूर्व तालुक्यांमध्ये) मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. यादरम्यान पूर्व विदर्भात काही प्रमाणात गारपिटीची शक्यतादेखील नाकारता येणार नाही. पावसाचे प्रमाण आणि शक्यता ८ तारखेला अधिक राहील; तर ९ तारखेला पावसाचे प्रमाण कमी होऊन पूर्व विदर्भातच पावसाची शक्यता राहील. दरम्यान, मराठवाडा आणि खान्देशसह मध्य महाराष्ट्रात ढगाळ हवामान राहील. ७ ते ९ दरम्यान विदर्भात ढगाळ हवामान आणि पावसामुळे किमान तापमानात वाढ अपेक्षित आहे, ज्यामुळे थंडीची तीव्रता कमी होईल. मात्र ८ आणि ९ तारखेला पावसामुळे दिवसा हवेतील गारवा जाणवेल. हवामानाच्या या स्थितीमुळे ८ ते १० जानेवारीदरम्यान विदर्भात पावसानंतर धुके पडण्याची स्थिती उद्भवेल. शेतकऱ्यांनी या हवामानाच्या स्थितीनुसार शेतीचे नियोजन करावे आणि काढणी केलेल्या पिकांना सुरक्षित ठेवावे, असे आवाहनही त्यांनी केले.
दरम्यान, रविवारी नागपुरातील रात्रीचे तापमान १२ अंश सेल्सिअससह सरासरी राहिले आहे. तर दिवसाचे तापमान २ अंशाने खाली घसरून २५.३ अंशावर आले आहे.
हवामान विभागानेसुद्धा ८ व ९ तारखेला पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. रविवारी विदर्भात चंद्रपूर १०.१ अंशासह सर्वाधिक थंड राहिले. बुलडाणा, गोंदिया, अकोला येथील किमान तापमान १०.२ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. तर गडचिरोली व यवतमाळमध्ये तापमान १४ अंश सेल्सिअस होते.