स्त्रीच्या जीवनाचे पैलू उलगडणारा कथात्म कोलाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2016 03:00 AM2016-06-29T03:00:57+5:302016-06-29T03:00:57+5:30

स्त्रियांच्या जीवनाचे अनेक पैलू आहेत. तिचे प्रत्येकाशी बदलत जाणारे नाते आणि भावनांंचा पट तसा गुंतागुंतीचा आणि हळवा आहे.

Storytelling collage that unfolds the life aspect of a woman | स्त्रीच्या जीवनाचे पैलू उलगडणारा कथात्म कोलाज

स्त्रीच्या जीवनाचे पैलू उलगडणारा कथात्म कोलाज

Next

अभिव्यक्ती संस्थेचे आयोजन : कथा लेखिकांचे दमदार सादरीकरण
नागपूर : स्त्रियांच्या जीवनाचे अनेक पैलू आहेत. तिचे प्रत्येकाशी बदलत जाणारे नाते आणि भावनांंचा पट तसा गुंतागुंतीचा आणि हळवा आहे. अभिव्यक्तीच्या सदस्यांनी हा स्त्रियांच्या जीवनाचा कोलाज कथांमधून सादर करीत एख अनोखा अनुभव श्रोत्यांना दिला. हा कार्यक्रम अभिव्यक्ती संस्थेच्यावतीने सादर करण्यात आला.
हा कार्यक्रम शंकरनगरच्या जिजामाता सभागृहात आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाला चित्रपट निर्मात्या आणि सेन्सॉर बोर्डाच्या नवनिर्वाचित सदस्य माधुरी आशिरगडे अध्यक्षस्थानी होत्या. मातेची ममता हा स्त्री लेखिकांच्या जिव्हाळ्याचा विषय त्यामुळे त्याला प्राधान्य होते. एका उच्चपदविभूषित मुलाची अनास्था व व्यावहारिक दृष्टिकोन यामुळे व्यथित झालेली आई विजया मारोतकर यांनी साकारली.
अल्पवयात आई झालेल्या जुलेखाची व्यथा अंजली पांडे यांच्या कथेतून दिसली. लेहसारख्या ठिकाणी काम करणाऱ्या वैमानिकांच्या बायकांना मायेचा ओलावा देणाऱ्या बॉसच्या पत्नीची ओळख गौरी अंधारे यांनी करून दिली. मोलकरीण हा सामान्य स्त्रियांच्या जीवनातला दुखरा कोपरा आहे. त्याबद्दलची काळजी मिटावी म्हणून शर्मिला महादेवकरांनी भेटीला आलेल्या देवालाच वेठीस कसे धरले हे आपल्या विनोदी शैलीत सांगितले.
एका अनोख्या पैजेची पूर्ती करणारी मुलगी वीणा कुळकर्णी यांनी उभी केली. स्वाती देशपांडेला गावातल्या कामगाराचं मदत करणं भावलं. तर छाया कावळेनी गावाकडल्या इरसालपणाचा प्रत्यय आपल्या वऱ्हाडी कथेतून दिला. माधुरी आशिरगडे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून कथाकथन प्रभावी होण्यासाठी कथेचा आशय व सादरीकरण दोन्ही महत्त्वपूर्ण आहे, हे सांगितले. अभिव्यक्तीतर्फे यासाठी एखादे शिबिर घ्यावे असेही त्यांनी सुचविले. कथा कथनासाठी आत्मविश्वास महत्त्वपूर्ण असून सर्व सादरीकरणात तो होता, असे त्या म्हणाल्या. कार्यक्रमाच्या सुरुवातीला माधुरीतार्इंचा सत्कार अभिव्यक्तीच्या अध्यक्ष सुप्रिया अय्यर यांनी केला. (प्रतिनिधी)

Web Title: Storytelling collage that unfolds the life aspect of a woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.