सडकछाप मजनुच्या त्रासाला कंटाळून महिलेने विष घेतले
By admin | Published: June 26, 2017 10:51 PM2017-06-26T22:51:07+5:302017-06-26T22:51:07+5:30
गेल्या आठ महिन्यांपासून मानसिक त्रास देणा-या सडकछाप मजनुच्या त्रासाला कंटाळून एका शिक्षीकेने (वय ३३) विष प्राशन केले. तिची
ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. २६ - गेल्या आठ महिन्यांपासून मानसिक त्रास देणा-या सडकछाप मजनुच्या त्रासाला कंटाळून एका शिक्षीकेने (वय ३३) विष प्राशन केले. तिची प्रकृती गंभीर असून, या घटनेमुळे सक्करदरा परिसरात खळबळ उडाली आहे. पीडित महिलेच्या पतीकडून तक्रार दाखल होतताच पोलिसांनी या प्रकरणी सौरभ प्रकाश ढोले (वय २६) याला अटक केली आहे.
पीडित शिक्षीका आणि आरोपी ढोले एकमेकांशेजारी राहतात. पीडितेचा पती खासगी नोकरी करतो. शेजारी म्हणून सहज बोलचाल करणा-या शिक्षीकेचा गेल्या आठ महिन्यांपासून आरोपी सौरभने पिच्छा पुरविणे सुरू केले आहे. तिचा पाठलाग करणे, सलगी साधण्याचे प्रयत्न करणे, हातवारे करणे, मोबाईलवर वारंवार मेसेज करणे, असे प्रकार सुरू झाल्यामुळे शिक्षीका त्रस्त झाली. तिने हा प्रकार पतीला सांगितल्यानंतर सौरभला शिक्षीकेच्या पतीने एकदा समजावूनही सांगितले. मात्र तो ऐकला नाही. बदनामी होईल, या धाकाने दाम्पत्य गप्प बसल्यामुळे आरोपी निर्ढावला. त्याचा त्रास दिवसागणिक वाढतच चालल्यामुळे प्रचंड दडपणात आलेल्या शिक्षीकेने रविवारी दुपारी विष घेतले. तिची प्रकृती गंभीर झाल्यामुळे तिला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सौरभच्या त्रासाला कंटाळून पत्नीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार पीडित महिलेच्या पतीने (वय ४३) सक्करदरा ठाण्यात नोंदवली. त्यावरून सहायक पोलीस निरीक्षक डेहनकर यांनी आरोपी सौरभ प्रकाश ढोले याच्याविरूध्द कलम ३५४ (ड) अन्वये गुन्हा नोंदविला.
महिलेची मृत्यूशी झुंज
या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. विष घेणा-या शिक्षीकेची प्रकृती गंभीर असून, सक्करद-यातील एका खासगी रुग्णालयात तिची मृत्यूशी झूंज सुरू आहे. डॉक्टरांकडून परवानगी मिळाली नसल्यामुळे पोलिसांना तिचे बयानही नोंदवता आले नाही. आरोपी सौरभ रिकामटेककडा असून, त्याला अटक करण्यात आली आहे.