विचित्रच; त्याने पत्नीचा आपत्तीजनक व्हिडिओ टाकला इन्स्टाग्रामवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 12:33 PM2021-08-12T12:33:11+5:302021-08-12T12:47:22+5:30
Nagpur News इन्स्टाग्रामवर पत्नीचा आपत्तीजनक व्हिडीओ व्हायरल केल्याची घटना नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : इन्स्टाग्रामवर पत्नीचा आपत्तीजनक व्हिडीओ व्हायरल केल्याची घटना नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. याप्रकरणी नंदनवन पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
२८ वर्षाच्या युवतीचे २०११ मध्ये लग्न झाले होते. लग्नापासून तिचा पती तिला त्रास देत होता. मागील वर्षभरापासून तो तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला त्रास देऊ लागला. गर्भवती झाल्यानंतर तिच्या पोटातील बाळ आपले नसल्याचे सांगत होता. दरम्यान, त्याने जबरदस्ती पीडितेचा गर्भपात केला. पीडितेच्या तक्रारीनुसार महिनाभरापूर्वी तिला पतीने मारहाण करून रात्री उशिरा घराबाहेर काढले. त्यानंतर ती नंदनवनमध्ये आपल्या बहिणीसोबत राहत आहे.
यापूर्वी सोबत राहत असताना त्याने आपल्या पत्नीची आपत्तीजनक व्हिडीओ क्लिप तयार केली होती. मंगळवारी रात्री एका इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्याने पत्नीचा आपत्तीजनक व्हिडीओ अपलोड केला. हे पाहून युवतीचे कुटुंबीय आश्चर्यचकित झाले. व्हिडीओ व्हायरल झाल्याची माहिती युवतीला मिळाल्यानंतर आरोपी पतीने तो व्हिडीओ इन्स्टाग्रामवरून काढून टाकला. परंतु युवतीच्या कुटुंबीयांनी त्याचा स्क्रीन शॉट घेतल्यामुळे त्याचे बिंग फुटले.
पीडित युवतीने नंदनवन पोलिसात याबाबत तक्रार दाखल केली. पोलिसांनी याप्रकरणी केवळ अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. महिलेचे आपत्तीजनक व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड करणे हा गंभीर गुन्हा आहे. त्यामुळे युवतीच्या पतीविरुद्ध छेडखानी आणि आयटी अ?ॅक्टनुसार गुन्हा दाखल करणे आवश्यक होते. परंतु नंदनवन पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला. पोलिसांनी पती-पत्नीतील वाद आणि न्यायालयात घटस्फोटासाठी प्रकरण असल्याचे सांगून पीडितेला परत पाठविले. यामुळे पीडित युवतीचे कुटुंबीय चिंतेत आहेत.
..........