रेल्वेचा अजब नियम; दोन ठिकाणचा पत्ता प्रवाशांसाठी डोकेदुखी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2020 08:55 PM2020-11-30T20:55:32+5:302020-11-30T20:56:00+5:30
Indian railway Nagpur News रेल्वेच्या वतीने जिथे जायचे आहे तेथील पत्ता टाकण्याची सक्ती करण्यात येत आहे. यामुळे प्रवाशांसह आरक्षणाचे तिकीट देणाऱ्या क्लर्कची डोकेदुखी वाढली असल्याची स्थिती आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रेल्वेचे आरक्षण केल्यानंतर आरक्षणाचा फॉर्म भरावा लागतो. त्यात जिथे जायचे ते गाव, गाडी क्रमांक, लिंग, वय आणि पत्ता टाकला की आरक्षण काऊंटरवरील क्लर्क तिकीट देतो. परंतु आता त्यात भर म्हणून रेल्वेच्या वतीने जिथे जायचे आहे तेथील पत्ता टाकण्याची सक्ती करण्यात येत आहे. यामुळे प्रवाशांसह आरक्षणाचे तिकीट देणाऱ्या क्लर्कची डोकेदुखी वाढली असल्याची स्थिती आहे.
रेल्वे प्रशासनाने कोरोनाच्या काळात प्रवाशांना स्थानिक पत्ता आणि जिथे जायचे आहे त्या ठिकाणचा पत्ता, जिल्हा, राज्य आणि पिनकोड टाकणे सक्तीचे केले आहे. अनेकदा तिकीट काढण्यासाठी गेलेल्या प्रवाशांना जेथे जायचे तेथील पत्ता, पिनकोड माहीत नसतो. अशा वेळी रांगेत क्रमांक लागल्यानंतरही त्यांना रांगेतून बाहेर निघून मोबाईलवरून तेथील पत्ता घ्यावा लागत आहे. यात प्रवाशांची गैरसोय होत आहे. अनेक प्रवाशांना जिथे जायचे तेथील पत्ता माहीत नसल्यामुळे तिकीट काऊंटरवर प्रवाशांच्या रांगा लागत आहेत. रेल्वेचा हा नवा नियम तिकीट काऊंटरवरील क्लर्क आणि नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. त्यामुळे रेल्वेने हा नवा नियम रद्द करावा, अशी मागणी प्रादेशिक रेल्वे उपभोक्ता सल्लागार समितीचे सदस्य सतीश यादव यांनी केली आहे. रेल्वेच्या या नियमामुळे नागरिकांमध्ये असंतोष व्यक्त करण्यात येत असून, आरक्षण खिडक्यांवरील क्लर्कही या नव्या नियमांमुळे त्रस्त झाल्याची माहिती आहे.
रेल्वेने नवा नियम रद्द करावा
दोन ठिकाणचा पत्ता टाकण्याची सक्ती करणे चुकीचे आहे. यामुळे प्रवाशांना त्रास होत आहे. बुकिंग क्लार्कची या नव्या नियमामुळे डोकेदुखी वाढली असून, रेल्वेने हा नियम रद्द करण्याची गरज आहे.
-बसंत कुमार शुक्ला, महासचिव, भारतीय यात्री केंद्र
प्रवाशांसाठी चांगला नियम
कोरोनाच्या काळात प्रवाशांना संपर्क साधण्यासाठी दोन्ही ठिकाणचा पत्ता टाकण्याची सक्ती करण्यात येत आहे. प्रवाशांना शोधण्यासाठी हा नियम चांगला असल्यामुळे प्रवाशांनीही रेल्वेला सहकार्य करण्याची गरज आहे.
-एस. जी. राव, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे, नागपूर विभाग