अजब चोरट्याची गजब कहानी.. थंडी वाजते म्हणून चक्क पेटवून दिली दीड लाखांची बाईक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2021 09:28 PM2021-12-25T21:28:19+5:302021-12-25T21:28:55+5:30
Nagpur News कडाक्याच्या थंडीत आजुबाजूला सरपण नसल्यामुळे एका चोरट्याने चक्क दीड लाखांची बाईकच पेटवली. या धगधगत्या बाईकचा शेक घेत चोरट्याने थंडीला पळवून लावले.
नागपूर - कडाक्याच्या थंडीत आजुबाजूला सरपण नसल्यामुळे एका चोरट्याने चक्क दीड लाखांची बाईकच पेटवली. या धगधगत्या बाईकचा शेक घेत चोरट्याने थंडीला पळवून लावले. अटक केल्यानंतर पोलिसांना त्याने मोटरसायकलची शेकोटी केल्याचे सांगितले. ते ऐकून पोलिसांनाच कापरे भरले.
घटना यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. दुचाकी चोरट्यांच्या टोळीचा छडा लावून पोलिसांनी अहमद खान रशिद खान, शेरा उर्फ समीर अहमद जाकिर अहमद, करण किशोर यादव तिघांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून ९ दुचाकी जप्त केल्या. चोरीची एक दुचाकी घेऊन मोहम्मद सरफराज सुलतान अंसारी तसेच सय्यद आसिफ सय्यद निजाम दोघे पळून गेले. त्यातील सरफराज नामक चोरट्याला शुक्रवारी पोलिसांनी अटक केली.
दुचाकी कुठे आहे, असा थेट प्रश्न पोलिसांनी केला. चोरट्याने शेतात असल्याचे सांगितले. त्यामुळे त्याला घेऊन पोलीस शेतात पोहचले. तेथे दुचाकीचा नुसता सांगाडा होता. ती पुर्णता जळाली होती. ती कशी जळाली, असा प्रश्न येताच चोरट्याने उत्तर दिले. त्या उत्तराने काही पोलिसांना कापरे भरले तर काहींना घाम फुटला. फरार झाल्यानंतर आसिफ पळून गेला. आपण पोलिसांच्या धाकाने दुचाकी घेऊन शेतात लपलो. रात्र वाढली तसा गारठाही वाढला. आजुबाजुला शेकोटी करण्यासाठी काहीच नव्हते. त्यामुळे दुचाकीच्या पेट्रोल टाकीला फोडून दुचाकीच पेटवून दिली. धगधगत्या दुचाकीच्या शेकोटीसमोर बसून आपण कडकडती थंडी पळवून लावली, असेही त्याने पोलिसांना सांगितले. दीड लाखाच्या बाईकची या चोरट्याने शेकोटी केल्याचे ऐकून (पाहून) पोलिसांना काय करावे, हेच सूचेनासे झाले आहे.
आसिफची कैफियत व्हायरल
या टोळीतील पाचवा फरार आरोपी आसिफ याने पोलिसांच्या धाकामुळे जीवन कसे निरर्थक झाले, त्याची कैफियत मांडणारा व्हिडीओ बनविला. ‘ये देखो मेरा लाईफ... क्या जिंदगी बन गयी है’ असे म्हणत हा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल केला होता. लोकमतच्या ऑनलाईन आवृत्तीला शुक्रवारी ती बातमी प्रकाशित झाल्यानंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली होती. आसिफचा शोध सुरू असून, त्याला आम्ही लवकरच अटक करू, असा विश्वास ठाणेदार संजय जाधव यांनी व्यक्त केला आहे.
-----