आश्चर्य! महावितरणमधील दिवंगत अभियंत्याची दोनवेळा बदली
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2023 11:37 AM2023-07-05T11:37:21+5:302023-07-05T11:38:36+5:30
भोंगळ कारभार : आधी चंद्रपूर, नंतर अमरावतीसाठी आदेश
कमल शर्मा
नागपूर : पदावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याची बदली झाल्याचे आजपर्यंत सर्वत्र पाहायला मिळाले; परंतु महावितरणने चमत्कारीक काम केले आहे. एका दिवंगत सहायक अभियंत्याची एकवेळ नाही, तर चक्क दोनवेळा बदली करण्यात आली आहे. हा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. त्यावर आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
प्रशांत वासुदेव म्हैसकर असे दिवंगत सहायक अभियंत्याचे नाव असून, ते चंद्रपूर येथील रहिवासी होते. नांदेड झोनच्या लोहा सर्कलमध्ये कार्यरत असताना त्यांना कर्करोग असल्याचे निदान झाले होते. त्यामुळे त्यांनी चंद्रपूर येथे बदली मागितली होती; परंतु त्यांच्या मागणीची दखल घेण्यात आली नाही. दरम्यान, २३ फेब्रुवारी २०२३ रोजी त्यांचे निधन झाले. त्यानंतर त्यांची चंद्रपूर येथे बदली करण्यात आल्याचा आदेश कुटुंबीयांना मिळाला. आदेशावर मात्र १३ फेब्रुवारी तारीख नमूद आहे. पुढे महावितरणने ३० जून रोजी त्यांची नांदेड येथून अमरावतीला बदली करण्याचा आदेश काढला. म्हैसकर यांच्या विनंतीवरून हा निर्णय घेण्यात आल्याचे कारण आदेशात देण्यात आले आहे. त्यामुळे दिवंगत कर्मचारी अशी विनंती कशी करू शकतो, हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
संघटनेने प्रकरण गंभीरतेने घेतले
इंजिनियर्स सबॉर्डिनेट इंजिनियर्स असोसिएशनने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी महावितरण अध्यक्षांना पत्र लिहून ही बाब निदर्शनास आणून दिली आहे. महावितरणची ही असंवेदनशील कृती म्हैसकर कुटुंबीयांसाठी क्लेषदायक आहे. त्यामुळे अभियंत्यांमध्ये रोष आहे, असेही संघटनेने पत्रात म्हटले आहे.
महावितरण म्हणते, चूक झाली
ही कृती जाणीवपूर्वक करण्यात आली नाही. सेवालाभाचे दावे निकाली निघेपर्यंत दिवंगत कर्मचाऱ्याचे नाव यंत्रणेमधून हटविले जाऊ शकत नाही. संबंधित यंत्रणेमुळेच ही चूक झाली. बदलीचा आदेश रद्द करण्यात येईल, असे महावितरणने सांगितले.