अजबच : रात्री लाभार्थ्यांच्या प्रतीक्षेत लसीकरण केंद्रे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 11:50 PM2021-03-06T23:50:19+5:302021-03-06T23:52:03+5:30
Vaccination centers waiting for beneficiaries कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात सर्वच केंद्रांवर गर्दी वाढल्याने मनपा आयुक्तांनी शुक्रवारपासून सकाळी ८ ते रात्री १० वाजेपर्यंत लसीकरण केंद्र सुरू ठेवण्याचे निर्देश दिले, परंतु सायंकाळी ६ वाजल्यानंतर लाभार्थ्यांच्या प्रतीक्षेत लसीकरण केंद्रे राहत असल्याचा अजब प्रकार मागील दोन दिवसांपासून दिसून येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात सर्वच केंद्रांवर गर्दी वाढल्याने मनपा आयुक्तांनी शुक्रवारपासून सकाळी ८ ते रात्री १० वाजेपर्यंत लसीकरण केंद्र सुरू ठेवण्याचे निर्देश दिले, परंतु सायंकाळी ६ वाजल्यानंतर लाभार्थ्यांच्या प्रतीक्षेत लसीकरण केंद्रे राहत असल्याचा अजब प्रकार मागील दोन दिवसांपासून दिसून येत आहे. विशेष म्हणजे, कोविशिल्डच्या एका व्हायलमध्ये १० तर कोव्हॅक्सिनच्या एका व्हायलमध्ये २० डोस असतात. जोपर्यंत एवढे लाभार्थी होत नाहीत, तोपर्यंत लाभार्थ्यांवर बसून राहण्याची वेळ येत आहे.
१ मार्चपासून तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणाला सुरुवात होताच, ज्येष्ठ, परंतु केंद्रावरील लसीकरणाचे नियोजन फसल्याने गर्दी वाढली. यातून वाद, भांडणे वाढली. काही ठिकाणी पोलिसांची मदत घेण्याची वेळ आली. यातून मार्ग काढण्यासाठी मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी सकाळी ८ ते दुपारी ३ व दुपारी ३ वाजेपासून ते रात्री १० वाजेपर्यंत लसीकरण केंद्र सुरू ठेवण्याचा सूचना शासकीयसह खासगी केंद्रांना दिल्या. सोबतच ‘स्पॉट रजिस्ट्रेशन’चा स्वतंत्र कक्ष स्थापन करण्याचे, गर्दीचे नियोजन करण्यासाठी सुरक्षारक्षकाची मदत घेण्याचे व पिण्याच्या पाण्यापासून ते बसण्याची सोय व स्वच्छतागृहाची सोय करण्याचा सूचनाही त्यांनी दिल्या, परंतु ही माहिती बहुसंख्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचली नाही. यामुळे दिवसा लसीकरणासाठी गर्दी तर रात्री शुकशुकाट राहत आहे. यातही लसीकरणासाठी किमान १० ते १५ लाभार्थी असणे आवश्यक आहे. एक-दोन लाभार्थी असल्यास त्यांना इतर लाभार्थ्यांची वाट पाहत बसावे लागत आहे. शनिवारी मेडिकलच्या केंद्रावर असाच प्रकार झाला. सायंकाळी ६.४५ वाजता ६२ वर्षीय महिला लाभार्थी लसीकरणासाठी आली, परंतु रात्रीचे ८.४५ वाजूनही लाभार्थी आले नसल्याने त्यांना विनालस परत जावे लागले.
४,५३२ ज्येष्ठांनी घेतली लस
शनिवारी खासगी हॉस्पिटलमधील केंद्रांची संख्या वाढल्याने लसीकरणाची संख्या ५० झाली आहे. या केंद्रावर ४,५३२ ज्येष्ठांनी लस घेतली, तर ४५ वर्षांवरील गंभीर आजार असलेल्या १,५२३ लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. हेल्थ वर्कर, फ्रंटलाइन वर्कर मिळून आज ७,२६४ लाभार्थ्यांनी लस घेतली.