जवळचे झाले होते परके, मग परक्याने निभावली दोस्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:07 AM2021-08-01T04:07:51+5:302021-08-01T04:07:51+5:30
- मंगेश बढे ठरले रुग्णांचा आधार : कुणाकडून घेतले नाही शुल्क, कुणाचे केले एकट्यानेच अंत्यसंस्कार प्रवीण खापरे / लोकमत ...
- मंगेश बढे ठरले रुग्णांचा आधार : कुणाकडून घेतले नाही शुल्क, कुणाचे केले एकट्यानेच अंत्यसंस्कार
प्रवीण खापरे / लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ना रक्ताचे नाते, ना जन्माचे बंध तरी असतो अर्ध्या रात्री सज्ज... हा भाव मैत्रीचा. दोस्ती ही निर्मळ, नि:स्वार्थ वृत्तीतून जन्माला येते. जणू संकटकाळी धावणारा देवच तो. कधीकाळी हा देव फार ओळखीचा नसतो किंवा दीर्घ परिचयाचाही नसतो. येतो, निर्लेप वृत्तीने सहकार्य करतो आणि अदृष्य होतो, पुन्हा कधी भेटेल याची गॅरंटीही नसते. कोरोना संक्रमणाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत असे अनेक देव अचानक अवतरले आणि मैत्रीच्या रूपाने आपले कर्तव्य पार पाडून अचानक अदृष्यही झाले. त्यांचाच एक प्रतिनिधी म्हणून मंगेश बढे या रुग्णवाहिका चालकाचा उल्लेख करावा लागेल.
२०२० मध्ये आलेल्या संक्रमणाच्या पहिल्या लाटेत जवळपास ७०० रुग्ण आणि २०२१ मध्ये आलेल्या दुसऱ्या लाटेत साधारत: १२०० रुग्णांना रुग्णालयापर्यंत पोहोचविण्याचे कार्य अहोरात्र मंगेश बढे या रुग्णवाहिका चालकाने केले. त्यांच्याकडून सेवेचे शुल्क घेतले नाही असे नाही. मात्र, जवळपास अर्ध्याअधिक रुग्णांना त्यांची तत्कालीन आर्थिक स्थिती पाहून काहीच न मागता सेवापूर्तीचा भाव आपल्या व्हॅलेटमध्ये जमा करून निघून जाण्यातच कर्तव्यबुद्धी मानली. विशेष म्हणजे, संक्रमणाच्या धास्तीने रुग्णाचा एकही नातेवाईक सोबत नसताना, हे कार्य मंगेश यांनी पार पाडले. संक्रमणाचा अतिउद्वेग असण्याच्या काळात तर बेड्सची चणचण निर्माण झाली होती. त्या काळात रुग्णांना बेड मिळविण्यासाठी अतोनात प्रयत्न करणाऱ्या मंगेश यांनी रुग्णवाहिकेतच प्राण सोडताना अनेक रुग्ण बघितले. तेव्हा त्यांच्या अंत्यसंस्काराची जबाबदारीही पूर्वजन्मीचा पुत्र म्हणून किंवा दोस्त म्हणून पार पाडली. निर्मोही वृत्तीने आपल्या जन्माचे कर्तव्य पार पाडणारा महाभारतकालीन मित्र श्रीकृष्ण जसा होता, तो. भाव मंगेश बढे यांच्या वृत्तीतून दिसतो.
एका क्षणात नाती निर्माण होतात
मी अमरावती येथील माेर्शी तालुक्यातील निंबी गावचा. आई-वडील शेतकरी व भजन-कीर्तनात रमलेले असतात. मी गेल्या १६ वर्षांपासून नागपुरात रुग्णवाहिका चालवितो. घरातील सारगर्भीत संस्कारांमुळे निर्माण झालेल्या वृत्तीला भाळून एका स्वयंसेवी संस्थेने मला रुग्णवाहिका दिली आणि कार्य करण्यास प्रोत्साहन दिले. दररोज भेटणाऱ्या रुग्णांच्या सुख-दु:खाच्या कथनातून एका क्षणात नाते निर्माण होते. जणू मागच्या जन्माचे नाते असावे, असे भासते. मात्र, भगवान श्रीकृष्णाच्या प्रेरणेने आपले कर्तव्य पार पाडल्यावर पुन्हा कधी रुग्णाची भेट होऊ नये असेच वाटते.
- मंगेश बढे, रुग्णवाहिका चालक
...............