पोलिसांचा ‘स्ट्रॅटेजिक’ बंदोबस्त
By admin | Published: July 31, 2015 02:50 AM2015-07-31T02:50:15+5:302015-07-31T02:50:15+5:30
विविध समाजातील प्रतिष्ठित लोकांशी समन्वय साधून पोलिसांनी त्यांना विश्वासात घेतले.
नागपूर : विविध समाजातील प्रतिष्ठित लोकांशी समन्वय साधून पोलिसांनी त्यांना विश्वासात घेतले. तसेच समाजकंटकांना पद्धतशीरपणे संदेश पोहोचवण्यात आला. त्यामुळे संवेदनशील वस्त्यांमध्ये सुद्धा कोणताही गैरप्रकार झाला नाही. इतकेच नव्हे तर ज्या कारागृहात याकूबला फाशी देण्यात आली त्या कारागृहाच्या परिसरातच ‘मॉर्निंग वॉक’ करणारे बिनधास्त फिरत होते. त्यामुळे शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी जी ‘स्ट्रॅटेजी’ अवलंबिली होती, ती यशस्वी ठरल्याचे दिसून आले.
याकूब मेमन याच्या फाशीच्या प्रकरणाकडे देशाचेच नव्हे तर संपूर्ण जगाचे लक्ष लागून होते. यातच कायद्यातील तांत्रिक गुंतागुंत आणि क्षणाक्षणाला बदलत असलेला घटनाक्रम यामुळे हे प्रकरण आणखीनच ताणून धरले होते. तेव्हा याकूबला फाशी होते किंवा नाही अशा दोन्ही परिस्थितीत शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची दाट शक्यता होती.
याकूबला नागपुरात फाशी दिली जाणार याची माहिती १५ दिवसांपूर्वीच बाहेर उघडकीस आली होती. त्यामुळे या प्रकरणावर चांगलीच चर्चा घडून येऊ लागली. फाशीचा विरोध करणारे आणि समर्थन करणारे असे दोन गट निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली होती. यातच सुरुवातीला केवळ नागपूर शहरापूरता घोषित ‘रेड अलर्ट’ हा बदलत्या घटनाक्रमानंतर संपूर्ण देशभरासाठी लागू करण्यात आला.
या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तांसह सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी शहर आणि ग्रामीण पोलिसांनी जी व्यूहरचना आखली ती पूर्णत: यशस्वी ठरली.
पोलिसांनी शहरातील जवळपास सर्वच संवेदनशील भागांमध्ये पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. काही रस्त्यांवर नाकेबंदीसुद्धा करण्यात आली होती. परंतु या नाकेबंदीदरम्यान सामान्य माणसाला कुठलाही त्रास होणार नाही, याची पुरेपूर काळजी घेण्यात आली होती. (प्रतिनिधी)