विदर्भात बसपाचे खाते उघडण्याची रणनीती तयार; ९ लोकसभा, विदर्भात २४ विधानसभा मतदारसंघ लक्ष्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2023 08:50 PM2023-07-12T20:50:49+5:302023-07-12T20:52:04+5:30
Nagpur News विदर्भातून खाते उघडण्यासाठी बसपाने पूर्ण रणनीतीसुद्धा आखली आहे. तेव्हा ‘वन बूथ टेन यूथ’ या फार्म्युल्यानुसार कामाला लागा, असे आवाहन बसपाचे केंद्रीय समन्वयक व महाराष्ट्राचे मुख्य प्रभारी राज्यसभा खासदार रामजी गौतम यांनी येथे केले आहे.
नागपूर : महाराष्ट्र ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची कर्मभूमी आहे. बसपाला यंदा निवडणुकीत चांगली संधी आहे. विदर्भातून खाते उघडण्यासाठी बसपाने पूर्ण रणनीतीसुद्धा आखली आहे. तेव्हा ‘वन बूथ टेन यूथ’ या फार्म्युल्यानुसार कामाला लागा, असे आवाहन बसपाचे केंद्रीय समन्वयक व महाराष्ट्राचे मुख्य प्रभारी राज्यसभा खासदार रामजी गौतम यांनी येथे केले आहे.
रविभवन येथे बुधवारी बसपाच्या महाराष्ट्र स्तरावरील मुख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत मुख्य मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. यावेळी बसपाचे दुसरे केंद्रीय समन्वयक भीम राजभवन, मनीष आनंद, प्रदेशाध्यक्ष संदीप ताजने प्रामुख्याने उपस्थित होते.
रामजी गौतम म्हणाले, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे पक्ष तुटले असून, यापुढे भाजपसुद्धा फुटणार आहे. अशा परिस्थितीत फुले-शाहू-आंबेडकरी मिशन चालवणाऱ्या बसपाकडे महाराष्ट्रातील नागरिक आशेने बघत आहेत. बसपाने निवडणुकीची पूर्ण रणनीती तयार केली आहे. राज्यात ९ लोकसभा व विदर्भात २४ विधानसभा मतदारसंघ लक्ष्य ठेवण्यात आले आहेत. त्यासाठी लवकरच राज्यभरात विधानसभा स्तरावर संकल्प यात्रा काढण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. यावेळी सुनील डोंगरे यांनी विदर्भ, मनीष कावळे यांनी मराठवाडा आणि डॉ प्रशांत इंगळे यांनी मुंबई विभागातील कार्याचा आढावा सादर केला. बैठकीला राज्यातील सर्व प्रदेश महासचिव, प्रदेश सचिव, राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष, जिल्हा प्रभारी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी रंजनाताई ढोरे, पृथ्वीराज शेंडे, राजीव भांगे, विजयकुमार डहाट, जिल्हाध्यक्ष संदीप मेश्राम, जिल्हा प्रभारी राहुल सोनटक्के, उत्तम शेवडे, अभिलेश वाहाने, शादाब खान, ओपुल तानगाडगे, सुरेखा डोंगरे, जितेंद्र घोडेस्वार उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. रवींद्र गवई यांनी केले. नागोराव जयकर यांनी आभार मानले.