मोकाट जनावरे ताब्यात : मानकापूर पोलिसांची धडक कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2019 12:46 AM2019-10-02T00:46:00+5:302019-10-02T00:47:15+5:30
वाहतुकीला अडसर निर्माण करणाऱ्या रस्त्यावरील मोकाट जनावरांना ताब्यात घेत पोलिसांनी त्या जनावरांच्या मालकांवर धडक कारवाई केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वाहतुकीला अडसर निर्माण करणाऱ्या रस्त्यावरील मोकाट जनावरांना ताब्यात घेत पोलिसांनी त्या जनावरांच्या मालकांवर धडक कारवाई केली. कारवाईदरम्यान जनावारचे मालक असलेल्या एका कुटुंबातील तिघांनी पोलिसांना शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. त्यामुळे मानकापूर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
नागपूरकरांसाठी सध्या एक डोकेदुखीचा विषय ठरलेले मोकाट जनावर आपल्या मालकांनी रस्ता विकत घेतल्याप्रमाणे बिनधास्त घोळका करून रस्त्यावर बसतात. कधी कधी रस्त्यावरच हाणामारी करतात. कितीही जोरात हॉर्न वाजवला तरी ते रस्त्यावर बसून राहतात. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. अपघाताची भीती असते. पुढे निघण्यासाठी थोडी धीटाई दाखविण्याचा प्रयत्न केल्यास ते अंगावर धावून येतात. जनावरे जागोजागी घाण करीत असल्यामुळे दुर्गंधी अन् रोगांना निमंत्रण मिळते. मोकाट जनावरांची ही समस्या नागपूरकरांना त्रस्त करणारी ठरली आहे. विशेष म्हणजे, महापालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासनही त्याकडे लक्ष देत नसल्याने नागपूरकरांमध्ये कमालीचा रोष निर्माण झाला आहे. या प्रचंड तापदायक प्रकाराचे सचित्र वृत्त लोकमतने सोमवारी ठळकपणे प्रकाशित केले. त्याची तातडीने दखल घेत मानकापूरचे ठाणेदार वजीर शेख यांनी सोमवारी मोकाट जनावरांच्या मालकांना तोंडी सूचनावजा नोटीस बजावली. त्याला दाद मिळत नसल्याचे पाहून त्यांनी आज मानकापुरातील विविध भागात मोकाट जनावरांना ताब्यात घेण्याची धडक कारवाई राबविली. वजीर शेख यांनी महापालिकेच्या संबंधित विभागाच्या मदतीने दुपारी १ वाजतापासून सायंकाळपर्यंत विविध भागात कारवाई राबविली. या कारवाईत पोलिसांनी १८ मोकाट जनावरांना महापालिका प्रशासनाच्या मदतीने ताब्यात घेऊन कोंडवाड्यात नेले. यावेळी जनावरांच्या मालकांपैकी पप्पू ऊर्फ मंगल गोरखनाथ राऊत, त्याची पत्नी रजनी आणि मुलगा आकाश यांनी पोलिसांच्या कारवाईचा विरोध करून त्यांना शिवीगाळ तसेच धक्काबुक्की केली. त्यामुळे तणाव निर्माण झाला. पोलिसांनी त्यांचा विरोध मोडित काढून त्यांच्याविरुद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण करण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला. त्याचप्रमाणे अन्य जनावरांचे मालक सुरेश यादव, बन्सी यादव, मनीष तिवारी, रामलाल यादव आणि शामकुंवर पांडे यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम १८६, २८९, २९०, २९१ तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १००, १०६, १०७ अन्वये गुन्हा दाखल केला.
नागरिकांकडून पोलिसांचे कौतुक
डोकेदुखीचा विषय ठरलेल्या मोकाट जनावरांना पकडून त्यांच्या मालकावर गुन्हे दाखल करण्याची ही कारवाई मानकापूर परिसरातील नागरिकांच्या कौतुकाचा विषय ठरली. कारवाईदरम्यान नागरिकांनीही पोलिसांना उत्स्फूर्त सहकार्य केले. ठाणेदार वजीर शेख यांच्या नेतृत्वात हवालदार अनिल चिखले, नायक सुनील बैस, मीना म्हस्के, पुष्पा, राहुल बोटरे, प्रीतम राऊत, गणेश नेरकर, वाहतूक शाखेचे सहायक निरीक्षक फर्नांडिस आणि त्यांचे सहकारी तसेच महापालिकेचे डॉ. महल्ले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कामगिरी बजावली.