नागपुरात रुजली, राज्यात विस्तारली पथनाट्य चळवळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2019 10:35 AM2019-02-11T10:35:02+5:302019-02-11T10:38:40+5:30
समाज परिवर्तनाच्या विचाराने प्रेरित झालेली ही पथनाट्य चळवळ उपराजधानीत रुजली आणि पुढे महाराष्ट्रभर बहरत गेली.
निशांत वानखेडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नाट्यगृह, रंगमंच, पडदा आणि दिग्दर्शकांच्या निर्देशानुसार अभिनय करणारे कलावंत अशा साच्यात बंदिस्त असलेली नाट्यकला एवढीच ओळख १९७० पर्यंत प्रेक्षकांना होती. अशात समांतर सिनेमाप्रमाणे प्रायोगिक रंगभूमी मूळ धरू लागली होती. नाटकांच्या एका वेगळ्या प्रकाराने लोकांना भुरळ पाडली. रंगमंच नाही, पडदा नाही आणि ठरलेली संहिताही नाही. नाटक सजायचे ते रस्त्यावर कुठेही. हो, पण त्यात समाजातील समस्यांचे धगधगते वास्तव मात्र होते आणि हे वास्तव बहुसंख्य वर्गाच्या हृदयाला भिडले होते. हे होते पथनाट्य. समाज परिवर्तनाच्या विचाराने प्रेरित झालेली ही पथनाट्य चळवळ उपराजधानीत रुजली आणि पुढे महाराष्ट्रभर बहरत गेली.
पथनाट्य ही नाट्यकला, नव्हे परिवर्तनाची चळवळ नागपूरच्या मातीत रुजविणारे ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी अस्वस्थ काळातील भारावलेला इतिहास मांडला. साधारणत: स्वातंत्र्याची दोन-तीन दशके लोटल्यानंतरचा तो काळ. जी आशा, अपेक्षा घेऊन स्वातंत्र्याची पहाट उगवली होती, ती पूर्ण होताना दिसत नव्हती. गरिबी, बेरोजगारी अशा समस्यांनी समाजमन होरपळत असताना तरुणांमध्ये प्रचंड अस्वस्थता पसरत होती. विद्रोही व दलित साहित्याच्या उदयाचाही हाच काळ. सिनेमाच्या भाषेत अमिताभ बच्चन नावाचे व्यक्तिमत्त्व उभे राहण्याचा काळ. अशा अस्वस्थ काळात सामाजिक व राजकीय जाणिवा असलेले ‘तिसरे थिएटर’ बादल सरकार आणि उत्पल दत्त यांच्या नेतृत्वात बंगालमध्ये बहरत होते व पथनाट्य या नावाने ते पंजाब, दिल्लीपर्यंत पसरले होते. खरं तर अगदी अमेरिकेतील निग्रोंचा लढा, जर्मनी ते जगभरात परिवर्तनाच्या आंदोलनामध्ये पथनाट्याने प्रचंड प्रभाव घातला होता. मात्र या काळात महाराष्ट्रतील नाट्य क्षेत्रात हे परिवर्तन यायचे होते. एका विशिष्ट वर्गाच्या कलादृष्टीपुरते मर्यादित असलेले हे क्षेत्र परिवर्तनवाद्यांना मात्र अस्वस्थ करीत होते. मुंबईत छबीलदास यांचे प्रायोगिक रंगभूमीने वाटचाल सुरू केली होती, तर विदर्भात काही परिवर्तनवादी तरुणांच्या हुंकारातून पथनाट्याचे वारे वाहू लागले होते.
रस्त्यावरील काव्यवाचन, सिंधी तरुणाचे पथनाट्य
डॉ. श्रीपाद जोशी यांच्यानुसार त्या काळात हौशी व व्यावसायिक नाटक संस्थांना एकत्रित करण्याचा प्रयत्न सुरू असताना नवतरुणांमध्ये नवे काहीतरी करण्याची ऊर्मी लागली होती. याचदरम्यान देबाशिष रॉय या बंगाली दिग्दर्शकाद्वारे नागपुरात सादर होत असलेल्या बंगाली नाटकांनी एक नवी दृष्टी या तरुणांना दिली. साधारणत: १९७५-७६ च्या काळात रस्त्यावर काव्यपाठाचा उपक्रम सुरू झाला. अर्थात डॉ. जोशी यांची ललित कला संस्था व आंबेडकरी कवींची मुक्तीवाहिनी या संस्थांनी त्यासाठी पुढाकार घेतला. हे पथकाव्य वाचन दर रविवारी आवळेबाबू चौकात रंगायचे, जे पुढे इतरही चौकात पसरू लागले. १९७७ मध्ये लक्ष्मीभुवन चौकात एक दिवस पथनाट्य सादरीकरणासाठी ठरला. अनिल चनाखेकर यांच्या नवप्रतिभा संस्थेचे कलावंत त्यात सहभागी होणार होते. ठरल्यानुसार काव्यवाचन सुरू झाले, मात्र चनाखेकर यांचे कलावंत पोहोचले नाही. याचवेळी श्रोत्यांमध्ये उपस्थित एका सिंधी तरुणाने पुढे येऊन ‘हनुमान जाग उठा’ या विषयावर १५ मिनिटांचे एकपात्री स्क्रिप्ट सादर केले आणि पथनाट्याची मुहूर्तमेढ रोवल्या गेली.
आणि सुरू झाला प्रवास
यानंतर दीपक ढोणे या तरुणाने लिहिलेल्या ‘शेंगदाणा’ या नाटकाचे अनेक प्रयोग विविध चौकात सादर झाले. यात गजानन पांडे यांच्या नाटकांची पुढे भर पडली. ‘जादुगार आणि गारुडी’चे अनेक प्रयोग सादर झाले. त्यावेळी जीवन विरकट नावाच्या एसीपीने पथनाट्यासाठी शहरातील १२ चौकांना कायम परवानगी दिली. खरे तर या नव्या नाट्यकलेने लोकांना भारावून सोडले होते आणि याची ख्याती बाहेरही पसरत होती. अकोला येथे एका नाट्य स्पर्धेचा परीक्षक म्हणून गेल्यानंतर तेथील आयोजकांनी पथनाट्य बसविण्याचा आग्रह केला. तेव्हा १५ दिवसात त्यांच्यासाठी पथनाट्य तयार केल्याची आठवण डॉ. जोशी यांनी नमूद केली. पुढे अकोल्याच्या या संस्थेने अरविंद देशमुख यांच्या लेखनातून बुलडाण्यापर्यंत पथनाट्याचे ३०० पेक्षा जास्त प्रयोग केले. पथनाट्यातून लेखक निर्माण झाले, त्यासाठी स्वतंत्र संहिता तयार झाल्या. अगदी टीव्हीचा प्रसार होईपर्यंत पथनाट्य कला प्रचंड बहरली होती.
साहित्य संस्कृती मंडळाची मान्यता
पथनाट्याला लोकांचा प्रचंड प्रतिसाद बघता त्यावेळचे साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सुरेंद्र बारलिंगे यांनी नाट्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर विविध समित्यांतर्गत पथनाट्याची स्वतंत्र समिती तयार केली व ५००० रुपये अनुदान जाहीर केले. या माध्यमातून पुढे रायपूरपासून गोव्यापर्यंत कलावंतांनी पथनाट्यांचे प्रयोग करीत महाराष्ट पिंजून काढला होता. वामन पात्रीकर यांचे ‘बाजारपेठ’, ज.रा. फणसाळकरांचे ‘माणसाचा केला देव’ यांच्यासह गजानन सगदेव, दिलीप ठाणेकर, अतुल भुसारी, प्रमोद भुसारी अशा लेखकांचे पथनाट्य महाराष्ट्रत गाजले.
दलित रंगभूमीशी एकरूप
महाराष्टष्ट्रत दलित व विद्रोही साहित्याच्या उगमानंतर पथनाट्य हा कलाप्रकार दलित रंगभूमीशी जणू एकरूप झाला. प्रतिष्ठित कला, साहित्यापासून दूर ठेवण्यात आलेल्या या समाजाने पथनाट्याला आपल्या अभिव्यक्तीचे माध्यम बनविले. संजय जीवने, प्रभाकर दुपारे, अमर रामटेके अशा नाटककारांनी पथनाट्याच्या संहिता लिहिल्या व सादर केल्या. हे नाट्य माध्यम महाराष्ट्रत पसरले.
प्रचारनाट्य ते कॉलेज कट्टा
पथनाट्य आता समाजाची अस्वस्थता आणि परिवर्तनापुरते मर्यादित राहिले नव्हते. ते प्रचाराचे व प्रबोधनाचे मोठे साधन झाले होते. हुंडा विरोध, स्त्री भ्रूणहत्या, पर्यावरण संरक्षण, बेटी बचाओ, साक्षरता मोहीम, व्यसनमुक्ती अशा जनजागृतीसाठी ते एक प्रभावी माध्यम ठरले, शिवाय राजकीय पक्षांचे प्रचाराचेही ते साधन झाले. महाविद्यालयीन तरुणांमध्ये याचा प्रचार झपाट्याने झाला, हेही विसरता येणार नाही.