नागपुरात कोरोना प्रादुर्भावाचा धोकाही वाढला : नागरिकांमध्ये संताप, कडक कारवाईची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2020 03:10 AM2020-05-08T03:10:04+5:302020-05-08T03:20:53+5:30
एकीकडे कोरोनाचा उद्रेक झाल्यासारखी स्थिती असताना नागपुरातील रस्त्यारस्त्यांवर बेजबाबदारांची वर्दळ वाढल्याने आश्चर्य आणि संताप व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी विनाकारण रस्त्यावर फिरून कोरोनाचा धोका वाढविणाऱ्या बेजबाबदारांवर कडक कारवाई करावी, अशी संतप्त मागणी पुढे आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एकीकडे कोरोनाचा उद्रेक झाल्यासारखी स्थिती असताना नागपुरातील रस्त्यारस्त्यांवर बेजबाबदारांची वर्दळ वाढल्याने आश्चर्य आणि संताप व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी विनाकारण रस्त्यावर फिरून कोरोनाचा धोका वाढविणाऱ्या बेजबाबदारांवर कडक कारवाई करावी, अशी संतप्त मागणी पुढे आली आहे.
नागपुरात गेल्या दोन-तीन दिवसांपासून कोरोनाबधितांची संख्या सारखी वाढत आहे. बुधवारी अचानक कोरोनाबाधितांचा आकडा वाढल्याने उपराजधानीकर अस्वस्थ झाले आहेत. एकीकडे हे चित्र असताना दुसरीकडे शहरातील जवळपास सर्वच भागातील रस्त्यांवर वाहनांची प्रचंड वर्दळ वाढली आहे. लॉकडाऊन संपल्यासारखे आणि कोणताच धोका नसल्यासारखे वाहनचालक रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. पोलिसांकडून दंड्यांचा प्रसाद देणे कमी झाल्यामुळे आणि कोणतीही चौकशी न करता किंवा अडवले जात नसल्याने रिकामटेकडे मंडळी चांगलीच निर्ढावली आहे. ज्यांना अत्यावश्यक काम आहे, अशातील मंडळी कमी आणि कोणतेही काम नसताना रस्त्यावर फिरणारे रिकामटेकडे जास्त आहेत.
या रिकामटेकड्यांच्या फेरफटक्यामुळे शहरातील रस्त्यांवर वर्दळ वाढली आहे. त्यामुळे कोरोना प्रादुर्भावाचा धोका आणखीनच जास्त वाढला आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये संताप आणि आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पोलिसांनी कडक भूमिका घ्यावी आणि विनाकारण रस्त्यावर फिरून कोरोना प्रादुर्भावाचा धोका वाढविणाऱ्या रिकामटेकड्यांना धडा शिकवावा, अशी मागणी पुढे आली आहे.
पोलीस आयुक्तांकडून दखल
दोन दिवसांपासून विविध भागात रस्त्यांवर वाढलेली वाहनधारकांची गर्दी बघून पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय चांगलेच नाराज झाले. त्यांनी आज दुपारी शहरातील सर्व अधिकाऱ्यांना कडक बंदोबस्ताचे आदेश दिले. वायरलेसवर सर्व पोलीस ठाण्यांच्या अधिकाºयांशी संवाद साधून त्यांनी रस्त्यारस्त्यावर नाकेबंदी कडक करण्याच्या सूचना केल्या. कुणालाही अत्यावश्यक कामाशिवाय फिरण्यास मुभा देऊ नका, असेही निर्देश दिले. मात्र ज्यांना अत्यावश्यक काम आहे अशांना त्यांच्या कामानिमित्त जाऊ द्या, असेही पोलीस आयुक्तांनी पोलीस अधिकाºयांना सांगितले.
दुपारी आदेश, सायंकाळी पाहणी
दुपारी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी होत आहे की नाही ते बघण्यासाठी पोलीस आयुक्त डॉ. उपाध्याय आज सायंकाळी शहरातील विविध भागांतील रस्त्यांवर फिरले. त्यांनी वेगवेगळ्या चौकात आणि मुख्य मार्गावर भेटी देऊन तेथील नाकेबंदी तसेच बंदोबस्ताची पाहणी केली. संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक ते दिशानिर्देशही दिले.