संगीतात असाध्य आजारही बरा करण्याची ताकद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2018 11:44 PM2018-08-24T23:44:40+5:302018-08-24T23:46:18+5:30
जगप्रसिद्ध बासुरीवादक पं. हरिप्रसाद चौरसिया शुक्रवारी एका कार्यक्रमात सादरीकरणासाठी नागपूरला आले होते. यावेळी त्यांनी लोकमतशी संवाद साधला. त्यांच्या मते शास्त्रीय संगीत हे औषधाप्रमाणे काम करीत असून यामध्ये कोणताही आजार बरा करण्याची शक्ती आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जगप्रसिद्ध बासुरीवादक पं. हरिप्रसाद चौरसिया शुक्रवारी एका कार्यक्रमात सादरीकरणासाठी नागपूरला आले होते. यावेळी त्यांनी लोकमतशी संवाद साधला. त्यांच्या मते शास्त्रीय संगीत हे औषधाप्रमाणे काम करीत असून यामध्ये कोणताही आजार बरा करण्याची शक्ती आहे. त्यांनी सांगितले, अमेरिकेमध्ये विविध आजारांच्या उपचारासाठी याचा उपयोग केला जात आहे व संगीतातील रागांवर प्रचंड संशोधन केले जात आहे. कोणता राग कोणत्या आजारावर प्रभावी काम करतो, यावर मंथन केले जात आहे. काही विद्यापीठांमध्ये ‘म्युझिक थेरेपी’ हा विषयही शिकविला जात आहे. हा गहन विषय आहे. आजाराच्या उपचारासाठी राग माहिती असणे केवळ महत्त्वाचे नाही तर ज्याच्यावर उपचार करायचा आहे, त्याचे नेचर जाणणेही महत्त्वाचे असते. त्याच्या आवडी निवडी जाणणे आवश्यक आहे. याशिवाय कोणत्या वेळी कोणता राग गायला तर त्याचा लाभ होईल, हेही महत्त्वाचे आहे. संगीतात असाध्य आजारही बरा करण्याची शक्ती आहे, त्यासाठी केवळ विश्वास असणे आवश्यक आहे. विदेशींनी हा विश्वास केला, मात्र आपल्याच देशात हा विश्वास स्वीकारला जात नसल्याची खंत या ८० वर्षीय कलावंताने व्यक्त केली.
उत्तर भारतातील या बासुरी वादकाला भारतातच नव्हे तर जगभरात सन्मानाने ओळखले जाते. कर्नाटकी संगीत व हिंदूस्थानी शास्त्रीय संगीतातील फरक विचारला असता, हा केवळ मूळत: भाषेचाच फरक असल्याचे ते म्हणाले. आम्ही बंधू आहोत. जी बासरी ते वाजवितात तीच आम्हीही वाजवितो. ह केवळ भाषेचा फरक आहे, मात्र संगीताला कुठलीही भाषा नसल्याचे ते म्हणाले. संगीतामध्ये विविध राग व रस आहेत व यांच्यामध्ये अतुट नाते आहे. ते चांगले आहेत तेव्हा चांगले आहेत आणि नाहीत तेव्हा नाहीत. मात्र आम्ही जेव्हा बासरी वाजवितो, तेव्हा गाण्यांचा प्रभाव असतो. गाणे मुख्य गोष्ट आहे. आवाजाशिवाय संगीत नाही, त्याचप्रमाणे संगीताशिवाय आवाज महत्त्वाचा नाही. बासरीमध्ये गिटार किंवा सतारीप्रमाणे तारा नाहीत किंवा तबल्याप्रमाणे बीट्सही नाहीत. तरीही त्याच्या स्वरलहरीने लोकांना भुरळ पडते. बासरीचे सुर कानी पडताच विविध भावना जागृत होतात. हे सर्वांनाच संमोहित करणारे आहे कारण ते ईश्वराची निर्मिती असल्याची भावना पं. चौरसिया यांनी व्यक्त केली.