रक्ताचं नातं मजबूत करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:06 AM2021-07-03T04:06:22+5:302021-07-03T04:06:22+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : गेल्या एक-सव्वा वर्षापासून आपण सगळे कोरोना महामारीशी झुंज देत आहोत. या काळात मोठ्या प्रमाणात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गेल्या एक-सव्वा वर्षापासून आपण सगळे कोरोना महामारीशी झुंज देत आहोत. या काळात मोठ्या प्रमाणात रक्ताची उणीव उजागर झाली. शासन, प्रशासन आणि विविध संघटनांनी ही तूट भरून काढण्याचे सातत्याने प्रयत्न केले. मात्र, ही तूट भरता भरेना अशी स्थिती आहे. कोरोनाने रक्ताचे नाते किती मजबूत असते, हे शिकवले आहे. म्हणून त्याच पार्श्वभूमीवर ‘लोकमत रक्ताचं नातं’ या उपक्रमात सहभागी होऊन, हे नाते आणखी वृद्धिंगत करण्याचे आवाहन राज्याचे ऊर्जामंत्री व नागपूरचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केले.
लोकमतचे संस्थापक व स्वातंत्र्य संग्राम सेनानी स्व. जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीदिनी २ जुलैपासून राज्यभर ‘लोकमत रक्ताचं नातं’ ही मोहीम राबवून रक्तदान शिबिर आयोजित केले जातील. लोकमत भवनातील जवाहरलाल दर्डा कला अकादमीच्या दालनात शुक्रवारी आयोजित कार्यक्रमात या उपक्रमाचा शुभारंभ ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व स्व. जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून करण्यात आला. प्रमुख अतिथी म्हणून महापौर दयाशंकर तिवारी, खासदार डॉ. विकास महात्मे, लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा, माजी आ. यादवराव देवगडे, आ. विकास ठाकरे, विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा, नागपूर महापालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी., जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, पोलीस आयुक्त अमितेशकुमार, आयएमए नागपूर शाखेचे अध्यक्ष डॉ. संजय देवतळे, लाईफलाईन ब्लड बँकेचे वैद्यकीय संचालक डॉ. हरीश वरभे, डागा हॉस्पिटलच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. सीमा पारवेकर, उन्नती फाउंडेशनचे प्रमुख अतुल कोटेचा, डाबरचे टेरीटोरी मॅनेजर अनुज रायपूरकर, अंकुर सिडसचे कार्यकारी संचालक विशाल उमाळकर, लोकमत समूहाचे व्यवस्थापकीय संचालक देवेंद्र दर्डा, सहव्यवस्थापकीय संचालक ऋषी दर्डा, कार्यकारी संचालक करण दर्डा, लोकमतचे संचालक (परिचालन) अशोक जैन आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन लोकमत समाचारचे सहायक उपाध्यक्ष मतीन खान यांनी केले.
५० हजार युनिट्सचे टार्गेट पूर्ण करू : विजय दर्डा
रक्ताचे नाते हे जाती-धर्माच्या पलीकडचे आहे. हे नाते किती मजबूत आणि विश्वासाचे असते, हे या काळात शिकलो आहोत. त्याच अनुषंगाने ‘लोकमत रक्ताचं नातं’ हा उपक्रम आहे. या उपक्रमातून एकट्या महाराष्ट्रात ५० हजार युनिट्स रक्त गोळा करण्याचे उद्दिष्ट आहे आणि हा एक प्रकारे विक्रमच होईल. हे उद्दिष्ट नागरिकांच्या विश्वासाने आपण पूर्ण करत आहोत. लोकमत समूह लवकरच ५० वर्षे पूर्ण करत आहे आणि पुढच्या वर्षी बाबूजींची जयंती शताब्दी आहे. त्या पार्श्वभूमीवर हा उपक्रम महत्त्वाचा असल्याचे विजय दर्डा म्हणाले.
‘थीम साँग’चे लोकार्पण
नागरिकांना रक्तदानासाठी प्रोत्साहित करण्यासाठी याच उपक्रमाच्या अनुषंगाने तयार केलेल्या ‘थीम साँग’चे लोकार्पण करण्यात आले. या गीताची रचना मतीन खान यांची असून आदित्य सालनकर यांनी गायले व संगीतबद्ध केले आहे. यावेळी गायक व गीतकारांचा सत्कार करण्यात आला.