मानसिक आरोग्याला सुदृढ बनवा

By admin | Published: April 1, 2015 02:33 AM2015-04-01T02:33:47+5:302015-04-01T02:33:47+5:30

जीवनामध्ये केवळ शारीरिक आरोग्यच तंदुरुस्त असून चालत नाही तर मानसिक आरोग्यालादेखील सुदृढ बनविण्याची आवश्यकता आहे.

Strengthen mental health | मानसिक आरोग्याला सुदृढ बनवा

मानसिक आरोग्याला सुदृढ बनवा

Next

नागपूर : जीवनामध्ये केवळ शारीरिक आरोग्यच तंदुरुस्त असून चालत नाही तर मानसिक आरोग्यालादेखील सुदृढ बनविण्याची आवश्यकता आहे. त्यादृष्टीने विद्यार्थीदशेपासूनच प्रयत्न करायला हवे, असे मत प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डॉ. विकास महात्मे यांनी व्यक्त केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेद्वारे देण्यात येणाऱ्या विद्यापीठस्तरीय पुरस्कारांचे मंगळवारी वितरण करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.
राष्ट्रीय सेवा योजनेत उत्कृष्ट काम करणारी महाविद्यालये, कार्यक्रम अधिकारी तसेच स्वयंसेवक यांना हे पुरस्कार देण्यात आले. दीक्षांत सभागृहामध्ये झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे होते. तर विशेष अतिथी म्हणून प्र-कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर, कुलसचिव डॉ. अशोक गोमाशे, ‘बीसीयूडी’ संचालक डॉ. श्रीकांत कोमावार हे उपस्थित होते.विद्यार्थी जीवनात राष्ट्रीय सेवा योजनेचे मोठे महत्त्व आहे. आयुष्यात ज्ञान तर ग्रहण केलेच पाहिजे, परंतु सोबतच कौशल्य वाढविण्यावरदेखील भर दिला पाहिजे. यासाठी सराव आवश्यक आहे. शिवाय सकारात्मक अभिवृत्तीदेखील निर्माण केली पाहिजे, असा सल्ला डॉ. महात्मे यांनी दिला. यावेळी त्यांनी ‘आॅडिओ-व्हिज्युअल’ सादरीकरणाद्वारे सकारात्मकतेच्या ‘टीप्स’ दिल्या. राष्ट्रीय सेवा योजनेद्वारे विद्यार्थीदशेतच समाजसेवेकडे विद्यार्थी ओढला जातो व आयुष्यभर हे संस्कार टिकून राहतात. शिक्षण जगण्याचे उत्तम साधन आहे. परंतु राष्ट्रीय सेवा योजना म्हणजे जगविण्याचे तसेच जागविण्याचे साधन आहे, असे मत डॉ. मुरलीधर चांदेकर यांनी व्यक्त केले. पुरस्कार वितरणाअगोदर उत्कृष्ट स्वयंसेवक रुफस थॉमस, उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी प्रा. कीर्ती मंगरुळकर व उत्कृष्ट महाविद्यालयाचा पुरस्कार पटकाविणाऱ्या मातृ सेवा संघ समाजकार्य संस्थेचे प्राचार्य डॉ.जॉन मेनाचेरी यांनी मनोगत व्यक्त केले. राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम समन्वयक डॉ.भाऊ दायदार यांनी प्रास्ताविक मांडले. विनोद राऊन यांनी संचालन केले. नागपूर, वर्धा, भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी व स्वयंसेवक यावेळी उपस्थित होते.(प्रतिनिधी)

Web Title: Strengthen mental health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.