दैनिक संकलनाचे काम खोळंबल्याने पतसंस्थांवर ताण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2020 09:16 PM2020-06-01T21:16:50+5:302020-06-01T21:19:05+5:30
ठेवी आणि दैनिक संकलन तसेच कर्जपुरवठा हा पतसंस्थांचा मुख्य आधार असला तरी कोरोनाच्या काळात हे काम खोळंबल्याने पतसंस्थांवर आर्थिक ताण आला आहे. नागपूर जिल्ह्यातील सुमारे १ हजार ८९ पतसंस्था यामुळे अडचणीत सापडल्या असून त्यावर अवलंबून असणारे दैनिक संकलकही आर्थिक अडचणीमध्ये आले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ठेवी आणि दैनिक संकलन तसेच कर्जपुरवठा हा पतसंस्थांचा मुख्य आधार असला तरी कोरोनाच्या काळात हे काम खोळंबल्याने पतसंस्थांवर आर्थिक ताण आला आहे. नागपूर जिल्ह्यातील सुमारे १ हजार ८९ पतसंस्था यामुळे अडचणीत सापडल्या असून त्यावर अवलंबून असणारे दैनिक संकलकही आर्थिक अडचणीमध्ये आले आहेत.
सहकार विभागाकडे असलेल्या नोंदीनुसार, नागपूर जिल्ह्यामध्ये सुमारे १ हजार ८९ सहकारी पतसंस्था आहेत. यातील अनेक पतसंस्था बऱ्याच जुन्या असून सहकार आणि गुंतवणुकीच्या क्षेत्रात महत्त्वाच्या आहेत. नागपूर शहरामध्ये सुमारे अडीच ते ३ हजार दैनिक संकलक आहेत. ते खातेदारांकडून दररोज ठराविक रक्कम गोळा करून संबंधिताच्या खात्यामध्ये बचत स्वरूपात जमा करतात. यातील बहुतेक खातेदार हातठेलाचालक, फूटपाथ व्यावसायिक तसेच गरीब वर्गातील आहेत. हे प्रतिनिधी घरपोच सेवा देत असल्याने या वर्गाला बचतीची सवय लागली आहे. या माध्यमातून अनेकांना पतसंस्थांचे कर्जही उपलब्ध झाले आहे.
या दैनिक संकलनातून प्रतिनिधींना ठराविक कमिशन मिळते. तसेच त्यांच्या माध्यमातून झालेल्या कर्जपुरवठ्याच्या वसुलीचेही कमिशन मिळते. एक संकलक पाच ते सहा तासात साधारणत: २० ते ३० हजार रुपयांचे कलेक्शन करतो. त्यावरील कमिशनवर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. मात्र मागील तीन महिन्यांपासून लॉकडाऊनमुळे बाजारपेठा बंद आहेत. व्यवहार बंद असल्याने संबंधित खातेदारांना दैनिक ठेव जमा करणे तसेच घेतलेल्या कर्जाचा परतावा करणेही अशक्य झाले आहे. यामुळे संकलकांसोबतच पतसंस्थाही आर्थिक अडचणीत सापडल्या आहेत.
राखीव निधीतून २५ टक्के द्या
दैनिक संकलकांना काम सुरू करताना संबंधित पतसंस्थांकडे अमानत रक्कम जमा करावी लागते. राखीव निधी या हेडखाली ही ५ टक्के रक्कम पतसंस्थाकडे जमा असते. ही ठेव संकलकाच्या व्यवसायावर अवलंबून असते. अनेकांच्या ठेवी जवळपास ५ लाखांपर्यंतही पोहचल्या आहेत. या संकटाच्या काळात राखीव निधीतून २५ टक्के रक्कम द्यावी, अशी मागणी संकलकांनी केली आहे. या संदर्भात मुख्यमंत्री आणि सहकार मंत्र्यांकडे पत्रव्यवहारही करण्यात आला आहे.
मागील तीन महिन्यांपासून वसुली ठप्प असल्याने पतसंस्थांच्या व्यवसायावर तसेच आम्हा संकलकांवरही प्रचंड आर्थिक ताण आला आहे. यातून बाहेर काढण्यासाठी सरकारने आम्हाला पॅकेज द्यावे तसेच, राखीव निधीमधून २५ टक्के रक्कम परत केली जावी.
धर्मेंद्र कारेमोरे, दैनिक संकलक