आबू खानला मदत करणाऱ्या लतिफ बाबूच्या मृत्यूवरून तणाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2022 09:03 PM2022-06-09T21:03:18+5:302022-06-09T21:05:04+5:30
Nagpur News पोलिसांच्या ताब्यात अडकलेला कुख्यात गुंड आबू खानला मदत करण्याचा ठपका असलेल्या लतिफ बाबूच्या अकस्मात मृत्यूमुळे तणाव निर्माण झाला आहे.
नागपूर : पोलिसांच्या ताब्यात अडकलेला कुख्यात गुंड आबू खानला मदत करण्याचा ठपका असलेल्या लतिफ बाबूच्या अकस्मात मृत्यूमुळे तणाव निर्माण झाला आहे. बुधवारी लतिफची पोलिसांनी चौकशी केली व घरी आल्यावर काही वेळातच मृत्यू झाला. पोलिसांच्या मारहाणीमुळेच लतिफचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या नातेवाइकांनी केला आहे. तर दुसरीकडे पोलिसांकडून मात्र असे काहीच झाले नसून त्याचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचा दावा केला आहे. या प्रकरणामुळे ताजबाग परिसरात तणावाचे वातावरण होते.
पोलिसांकडून आबू खानची कसून चौकशी सुरू आहे. त्याला कुणी मदत केली होती, याबाबत पोलीस तपास करत आहेत. फरार असताना लतिफ बाबूने मदत केल्याचे बयाण आबू खानने दिले होते. त्यावरून पोलिसांनी लतिफला चौकशीसाठी सक्करदरा पोलीस ठाण्यात बोलविले होते. त्यावेळी उपायुक्त नुरूल हसन हे नाईट राऊंडवर होते; परंतु लतिफ येताच ते अवघ्या ३५ सेकंदांत निघून गेले. त्यामुळे लतिफला बुधवारी परत बोलविण्यात आले. बुधवारी रात्रीपर्यंत लतिफची चौकशी करण्यात आली. लतिफ साडेदहानंतर घरी पोहोचल्यावर काही वेळाने छातीत दुखायला लागले. लतिफला तातडीने कुटुंबीयांनी दवाखान्यात नेले; परंतु तोपर्यंत मृत्यू झाला होता. गुरुवारी सकाळी नातेवाईक व परिसरातील नागरिक एकत्र आले व पोलिसांच्या मारहाणीमुळे मृत्यू झाल्याचा आरोप केला.
सक्करदरा पोलीस ठाण्याला घेराव
ताजबाग वस्तीतील शेकडो नागरिकांनी गुरुवारी सकाळी दहा वाजता सक्करदरा पोलीस ठाण्याला घेराव घातला होता. पोलिसांच्या मारहाणीत लतिफचा मृत्यू झाल्याचा दावा ते करत होते.
मी चौकशी केलीच नाही : हसन
यासंदर्भात पोलीस उपायुक्त नुरूल हसन यांना विचारणा केली असता त्यांनी आबूने आपल्या बयाणात लतिफ बाबूकडून पैसे मिळाल्याचे सांगितल्याचे स्पष्ट केले. मकोकाच्या फरार आरोपीची मदत करणाऱ्या लतिफ बाबूला सक्करदरा एसीपींनी चौकशीसाठी ६ जूनला रात्री बोलविले होते. नाईट राऊंड असल्याने मी ठाण्यात पोहोचलो. रात्रीची वेळ असल्याने दिवसा लतिफला चौकशीला बोलविण्याचे मी निर्देश दिले. ७ जून रोजी नोटीस देऊन लतिफला ८ जून रोजी सकाळी चौकशीसाठी बोलविण्यात आले होते. सहायक आयुक्तांनी चौकशी करून लतिफला घरी पाठविले होते. मी लतिफची चौकशीदेखील केली नव्हती व पोलीस कर्मचाऱ्यांनीदेखील कुठलीही मारहाण केलेली नाही, असा दावा त्यांनी केला. लतिफला याअगोदरदेखील दोनदा हृदयविकाराचा झटका आला होता, अशी माहिती सूत्रांनी दिली.