तणावग्रस्त जवान घेत आहेत सहकाऱ्यांचे बळी, 5 वर्षांत 9 घटना
By नरेश डोंगरे | Published: August 1, 2023 09:50 PM2023-08-01T21:50:47+5:302023-08-01T21:51:03+5:30
२० जणांनी नाहक गमावला जीव
नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: सुरक्षेच्या नावाखाली ज्यांच्या हातात शस्त्रे दिली जाते. तिच मंडळी आपल्या सहकाऱ्यांच्या जिवावर उठत आहे. गेल्या पाच वर्षांत आपल्याच साथीदारांची हत्या केल्याच्या 9 घटना उजेडात आल्या आहेत. या घटनांमध्ये २० जणांचे जीव गेले आहे.
संरक्षण मंत्रालयाचा थिंक टँक मानला जाणाऱ्या युनायटेड सर्व्हीस इन्स्टिट्यूशन ऑफ इंडियाने (यूएसआय) दोन वर्षांपूर्वी एक अहवाल दिला होता. त्यात सुरक्षा यंत्रणेत काम करणारी अर्ध्यापेक्षा जास्त मंडळी तणावग्रस्त असल्याचे म्हटले होते. या तणावाचे कारण वेगवेगळे असले तरी प्रामुख्याने सोबत काम करणारे वरिष्ठ कुचंबना करीत असल्याची भावना तीव्र झाल्यानंतर अशा घटना घडतात, असे सुरक्षा यंत्रणांत काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचे मत आहे. जयपूर - मुंबई सुपरफास्ट एक्सप्रेसमध्ये सोमवारी पहाटे घडलेल्या घटनेतून हा विषय पुन्हा एकदा चर्चेला आला आहे.
सुरक्षा यंत्रणांमध्ये काम करणारी बहुतांश मंडळी कुटुंबापासून दूर राहते. त्यात सततची दगदग, वेळी-अवेळी मिळणारे जेवण, अपूर्ण झोप आणि वरिष्ठांकडून पडणारी झाप ही या मंडळींना चिडचिडेपणा देऊन जाते. त्यामुळे ते शिघ्रकोपी बनतात आणि नंतर क्षणिक कारणावरून त्यांच्याकडून असे भयावह कृत्य घडते.
गडचिरोली जिल्ह्यात चार आठवड्यांपूर्वी राज्य राखीव पोलीस दलाचा जवान सुरेश मोतीलाल राठोड यांची केंद्रीय राखीव पोलीस दलाचा जवान मारोती सातपुते (वय ३३) याने चाकूने हत्या केली. २१ मे २०२३ ला बिहार विशेष सशस्त्र पोलीस दलातील जवान सोनू कुमार याची आरोपी जवान कैमूर याने गोळी मारून हत्या केली. २५ डिसेंबर २०२२ ला कांकेर छत्तीसगडमध्ये सीएएफचा जवान पुरुषोत्तम सिंह याने मेजर सुरेंद्र भगतची गोळी मारून हत्या केल्याचे उघड झाले. तर, जम्मू काश्मिरच्या पुंछ मध्ये आरोपी जवान अहमद याने त्याचा सहकारी जवान ईबरारची गोळी झाडून हत्या केली. नंतर स्वत: आत्महत्या केल्याची घटना १५ जूलै २०२२ ला उजेडात आली.
मोठ्या घटना - सुकमा, छत्तीसगड
नोव्हेंबर २०२१ मध्ये नक्षलग्रस्त सुकमा (छत्तीसगड) मध्ये सीआरपीएफच्या ५० व्या बटालियनमध्ये कार्यरत जवान रितेश रंजन याने एके ४७ ने अंधाधूंद गोळीबार करून सीआरपीएफचे चार जवान धनजी, राजीव मंडल, राजमनी कुमार यादव आणि धर्मेंद्र कुमार यांची हत्या केली. तर धनंजय कुमार सिंह, धरमात्मा कुमार आणि मलय रंजन महाराणा या चाैघांना जखमी केले होते.
छत्तीसगडमधीलच दुसऱ्या एका घटनेत छत्तीसगड आर्म्स फोर्सच्या जवानाने आपल्या दोन साथीदारांना गोळ्या घालून ठार मारले होते.
गाजियाबाद, उत्तर प्रदेश
चार वर्षांपूर्वी गाजियाबादमध्ये एका जवानाने ईंसासने फायरिंग करून तीन सहकारी जवानांची हत्या केली होती.
मुंबई, महाराष्ट्र
मुंबई जयपूरमध्ये आरोपी चेतन सिंह याने त्याचे वरिष्ठ सहकारी आरपीएफचे फाैजदार टिकाराम मिना यांच्यासह चाैघांची हत्या केली. गेल्या आठवड्यात पुण्यात एका एसीपीने पत्नी आणि पुतण्याची गोळ्या घालून हत्या केल्यानंतर स्वत: आत्महत्या केली. वारंवार घडणाऱ्या या भयावह घटना सुरक्षा यंत्रणांत काम करणाऱ्या पोलिसांपासून, जवानांपासून तो वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी बोधप्रद ठराव्या.