भाजपचा नेता-कार्यकर्ता महायुतीविरोधात बोलला तर कठोर कारवाई; प्रदेशाध्यक्षांचा थेट इशारा
By योगेश पांडे | Published: October 15, 2024 09:08 PM2024-10-15T21:08:15+5:302024-10-15T21:48:24+5:30
भाजपचा नेता-कार्यकर्ता महायुतीविरोधात बोलला तर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराच त्यांनी दिला आहे.
योगेश पांडे - नागपूर, लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षातील वाचाळवीरांविरोधात भारतीय जनता पक्षाने कठोर भूमिका घेतली आहे. रामटेकमध्ये माजी आमदार मल्लिकार्जून रेड्डी यांना निलंबित केल्यानंतर पक्षात खळबळ उडाली असताना प्रदेशाध्यक्षांनी इतर ठिकाणीदेखील आवश्यकता पडल्यास असेच पाऊल उचलण्यात येईल, अशी भूमिका मांडली आहे. भाजपचा नेता-कार्यकर्ता महायुतीविरोधात बोलला तर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराच त्यांनी दिला आहे.
मागील काही काळापासून पक्षातील वाचाळवीरांमुळे महायुतीत दरी निर्माण होते की काय असे चित्र निर्माण झाले होते. राज्यातील विविध भागांमध्ये अशा वाचाळ पदाधिकाऱ्यांमुळे पक्ष अडचणीत येत होता. मागील महिन्यातच बावनकुळे यांनी अशा नेत्यांना इशारा दिला होता. मात्र तरीदेखील काही जणांनी तशीच भूमिका ठेवली आहे. पक्षाच्या धोरणांविरोधात भूमिका घेतल्यामुळे रेड्डी यांना सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले. मात्र केवळ रेड्डींवरच कारवाई थांबणार नसल्याचे संकेत प्रदेशाध्यक्षांनी दिले आहेत. पक्षाने काही कठोर निर्णय घेतले आहे. पक्षविरोधी कारवाया करणे, पक्षाच्या अंतर्गत विषयाला सार्वजनिकपणे बोलत पक्षशिस्तीचे उल्लंघन करणे असे प्रकार काही जणांकडून करण्यात आले. पुढील काळात महायुतीविरोधात जो नेता किंवा कार्यकर्ता जाहीर बोलेल किंवा बंड पुकारेल त्याविरोधात कारवाई होईल. पक्षाच्या मंचावर निश्चित प्रत्येकाला नाराजी मांडता येईल, मात्र सार्वजनिकपणे पक्षविरोधी भूमिका मान्य करण्यात येणार नाही, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
- निवडणूक आयोगाविरोधात बोलण्याचा मुद्दाच नाही
विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यावर विरोधी पक्षांकडून सरड्यासारखा रंग बदलण्यात आला आहे. ते एकाच टप्प्यात निवडणूक का आहे असा सवाल करत आहेत. मात्र लोकसभेत सात टप्प्यात निवडणूक झाली तेव्हादेखील त्यांनी टीका केली होती व आता महाराष्ट्रात एकाच टप्प्यात निवडणूक होत असताना ते परत निवडणूक आयोगाविरोधात बोलत आहेत. त्यांना निवडणूकीत पराभव दिसतो आहे. त्यामुळे ते असा प्रकार करत आहेत, असे प्रतिपादन बावनकुळे यांनी केले.