स्वातंत्र्य दिनाचा कडकोट बंदोबस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:12 AM2021-08-15T04:12:20+5:302021-08-15T04:12:20+5:30
- महत्त्वाच्या ठिकाणी अतिरिक्त बंदोबस्त - - सायंकाळपासूनच गस्त सुरू - झोपडपट्टी सर्चिंग - संवेदनशील वस्त्यांवर नजर लोकमत न्यूज ...
- महत्त्वाच्या ठिकाणी अतिरिक्त बंदोबस्त -
- सायंकाळपासूनच गस्त सुरू
- झोपडपट्टी सर्चिंग
- संवेदनशील वस्त्यांवर नजर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने शहरात पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त लावला आहे. ८०० अधिकाऱ्यांसह सुमारे ४ हजार पोलीस कर्मचारी स्वातंत्र्य दिनाच्या बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहे.
स्वातंत्र्य दिनी देशात काही ठिकाणी घातपात होण्याची शक्यता वर्तवून अनेक ठिकाणी अलर्ट देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर, पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी शहरातील सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांना शनिवारी सायंकाळपासून अलर्ट आणि ॲक्शन मोडवर राहण्याचे सूचनावजा आदेश दिले आहेत. शहरातील संघ मुख्यालय, दीक्षाभूमी, पोद्दारेश्वर राम मंदिर, विधानभवन, रेल्वे स्थानक, विमानतळाच्या आजूबाजूचा परिसर, तसेच अन्य महत्त्वाच्या ठिकाणी कडकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे. ८०० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह ४ हजार पोलिसांचा ताफा तैनात करण्यात आला आहे. शीघ्र कृती दलाचे जवान, दंगा नियंत्रण पथक, बॉम्बशोधक आणि नाशक पथकालाही सज्ज ठेवण्यात आले आहे.
शहरातील झोपडपट्टीत रात्रभर सर्चिंग केले जाणार असून, संवेदनशील वस्त्यांवरही नजर रोखण्यात आली आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येपासूनच शहरातील विविध भागांत गस्त वाढविण्यात आली आहे.
---
पोलीस आयुक्तांचे आवाहन
पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी नागपूरकरांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. स्वातंत्र्य दिनाचा सोहळा उत्साहात साजरा करा. मात्र, कुठेही व्यक्ती अथवा वस्तू संशयास्पद अवस्थेत आढळल्यास पोलिसांना तातडीने कळवा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
----