नागपुरात प्लास्टिक बंदीची १ जुलैपासून कठोर अंमलबजावणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2022 08:30 AM2022-05-28T08:30:00+5:302022-05-28T08:30:01+5:30
Nagpur News नागपुरात १ जुलैपासून बाजारात कोणतीच प्लास्टिक कॅरीबॅग वापरता येणार नाही. सार्वजनिक ठिकाणी वापरण्यात येणारे प्लास्टिक ग्लास ,चमचे, वेगवेगळ्या वस्तूंचे वेष्टन यापुढे प्लास्टिकचे ठेवता येणार नाही.
नागपूर : प्लास्टिक वापरासंदर्भात राज्य शासनाने निर्बंध घातले आहे. सुरुवातीला त्याची अंमलबजावणी झाली. परंतु नंतर जैसे थे झाले आहे. परंतु प्रशासनाने पुन्हा एकदा प्लास्टिक वस्तूच्या वापराबाबत कठोर अंमलबजावणीचा निर्णय घेतला आहे. १ जुलैपासून बाजारात कोणतीच प्लास्टिक कॅरीबॅग वापरता येणार नाही. सार्वजनिक ठिकाणी वापरण्यात येणारे प्लास्टिक ग्लास ,चमचे, वेगवेगळ्या वस्तूंचे वेष्टन यापुढे प्लास्टिकचे ठेवता येणार नाही. १ जुलैपासून यासंदर्भात कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे शुक्रवारी प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
सिंगल युज प्लास्टिक निर्मूलनाचे काम मिशन मोडवर करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हास्तरीय कृतिदलाची सभा शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती सभागृहात पार पडली.
निवासी उपजिल्हाधिकारी विजया बनकर अध्यक्षस्थानी होत्या. या सभेला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी अनंत काटोले यांच्यासह विविध विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते. सिंगल युज प्लास्टिक उत्पादने व वस्तूंचे निर्मूलन करण्यासाठी यंत्रणांनी पुढाकार घ्यावा, नगरपालिका क्षेत्रात व मोठ्या गावांमध्ये सिंगल युज प्लास्टिकचा वापर होणार नाही याची दक्षता घ्यावी. सिंगल युज प्लास्टिक बंदीसाठी समन्वयातून यंत्रणांनी काम करावे. या प्लास्टिकचे योग्य प्रकारे निर्मूलन करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
नागरिकांनीही घ्यावा पुढाकार
- नागरिकांनी प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर करू नये.
- शहरी भागातील सिंगल युज प्लास्टिक एकत्र करून नगरपालिकेच्या कचरा गाडीमध्येच टाकावे.
- कापडी व कागदी पिशव्यांचा वापर पर्याय म्हणून करावा.
- नागरिकांनी साहित्य, वस्तू खरेदी करताना दुकानदारांना प्लास्टिक पिशव्यांचा आग्रह धरू नये.