कठोर निर्बंधांमुळे रस्त्यावरील गर्दी ओसरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:07 AM2021-04-22T04:07:42+5:302021-04-22T04:07:42+5:30

नागपूर : लॉकडाऊनच्या कठोर निर्बंधांत जीवनावश्यक वस्तूंची दुकानेवगळता सर्व प्रकारची दुकाने बंद असतानाही नागपुरात किराणा दुकानात ग्राहकांची सर्वाधिक गर्दी ...

Strict restrictions reduced road congestion | कठोर निर्बंधांमुळे रस्त्यावरील गर्दी ओसरली

कठोर निर्बंधांमुळे रस्त्यावरील गर्दी ओसरली

Next

नागपूर : लॉकडाऊनच्या कठोर निर्बंधांत जीवनावश्यक वस्तूंची दुकानेवगळता सर्व प्रकारची दुकाने बंद असतानाही नागपुरात किराणा दुकानात ग्राहकांची सर्वाधिक गर्दी दिसत होती. पण, प्रशासनाच्या कठोर निर्णयामुळे किराणा दुकाने सकाळी ११ पर्यंत सुरू राहणार असल्याने बुधवारी रस्त्यावरील गर्दी ओसरल्याचे चित्र दिसून आले.

इतवारी व मस्कासाथ घाऊक बाजारासह शहरातील सर्वच किरकोळ किराणा दुकानांत वस्तूंच्या खरेदीसाठी ग्राहकांची सर्वाधिक गर्दी व्हायची. पण, आता वेळेच्या मर्यादेमुळे सकाळी ११ नंतर बाजारात शुकशुकाट असतो. किराणा वस्तू खरेदीसाठी लोक दररोज घराबाहेर पडायचे. त्यामुळे किराणा बाजारात सकाळपासून सायंकाळपर्यंत गर्दी दिसून यायची. या ठिकाणी कारवाई करणारे कुणीही नव्हते. दुकानदार ग्राहकांना मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यास सांगत होते. पण, अनेक ग्राहक त्याकडे कानाडोळा करीत असल्याचे चित्र होते. त्यामुळे व्यापा-यांनी दुकानासमोर दो-या वा कठडे उभारले. गर्दीमुळे व्यापारी आणि दुकानात काम करणारे कर्मचारीसुद्धा कोरोना स्प्रेडर ठरत होते. गर्दी कमी करण्यासाठी उपाययोजना करताना इतवारी किराणा असोसिएशनने दुकाने सकाळी ९ ते दुपारी ४ पर्यंत सुरू ठेवणे आणि शनिवार व रविवारी दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. पण, आता प्रशासनाने सकाळी ११ पर्यंत दुकाने सुरू ठेवण्याचा निर्णय घेतल्याने दोन दिवसांपासून बाजारात लोकांची गर्दी दिसून आली नाही.

व्यापारी व कर्मचा-यांसाठी

आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक

मनपा आयुक्तांच्या आदेशानुसार फार्मसी असो वा जीवनावश्यक वस्तूंचे दुकानदार वा भाजी व फळेविक्रेते आणि त्यांच्या कर्मचा-यांसाठी आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक केली आहे. व्यापारी आणि कर्मचारी हे नेहमीच ग्राहकांच्या संपर्कात येत असल्याने ते कोरोना स्प्रेडर ठरत आहेत. या संदर्भात मनपाचे एनडीएस पथक चाचणीचे अहवाल पाहून दुकानदारांकडून दंड वसूल करीत आहे. मंगळवारी एनडीएस पथकाने आरटीपीसीआर चाचणी अहवाल नसल्याने नागपुरातील चार फार्मसी संचालकांकडून प्रत्येकी एक हजार रुपयांचा दंड वसूल केला. अशा प्रकारची कारवाई आता प्रत्येक फार्मसी आणि जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानात राबविण्यात येणार आहे.

Web Title: Strict restrictions reduced road congestion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.