अधिवेशनात कडेकोट बंदोबस्त अन् रेस्टॉरंटमध्ये होतेय अवैधपणे दारू ‘सर्व्ह’, पोलिसांची कारवाई
By योगेश पांडे | Updated: December 18, 2024 23:13 IST2024-12-18T23:13:02+5:302024-12-18T23:13:08+5:30
Nagpur: उपराजधानीत हिवाळी अधिवेशन सुरू असताना हॉटेल्स व रेस्टाॅरंट्समध्ये गर्दी वाढली आहे. काही रेस्टाॅरंटचालकांकडून अवैधपणे दारू पुरविली जात आहे. पोलिसांनी अशाच दोन रेस्टॉरंट्सवर धाड टाकून तेथील दारूविक्रीचा भंडाफोड केला.

अधिवेशनात कडेकोट बंदोबस्त अन् रेस्टॉरंटमध्ये होतेय अवैधपणे दारू ‘सर्व्ह’, पोलिसांची कारवाई
- योगेश पांडे
नागपूर - उपराजधानीत हिवाळी अधिवेशन सुरू असताना हॉटेल्स व रेस्टाॅरंट्समध्ये गर्दी वाढली आहे. काही रेस्टाॅरंटचालकांकडून अवैधपणे दारू पुरविली जात आहे. पोलिसांनी अशाच दोन रेस्टॉरंट्सवर धाड टाकून तेथील दारूविक्रीचा भंडाफोड केला. परिमंडळ एकच्या पोलिस उपायुक्त पथकाने ही कारवाई केली.
पहिली कारवाई बजाजनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत कॉर्नर हाऊस रेस्टॉरंट येथे करण्यात आली. बुधवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी तेथे धाड टाकली. तेथील संचालक प्रज्वल विजय हटवार (वय ५१, वकीलपेठ) याने ग्राहकांना दारू पिण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली होती. पोलिसांनी तेथून दारूच्या बाटल्या जप्त केल्या. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरी कारवाई राणाप्रतापनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सूर्यकांत सावजी (त्रिमूर्तीनगर चौक) येथे झाली. तेथे नितिकेश ऊर्फ गोलू तेजराम बत्तासे (२५, जुनी मंगळवारी, टेलिफोन एक्स्चेंज चौक) हा ग्राहकांना दारू पिण्यासाठी जागा उपलब्ध करून देताना आढळला.
पोलिसांनी तेथून दारू जप्त केली. त्याच्याविरोधातदेखील गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक एस. व्ही. झामरे, गजानन पवार, स्वप्निल करंडे, मनोहर राठोड, गौरव पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली. बजाजनगर, रिंग रोड, त्रिमूर्तीनगर, ऑरेंज स्ट्रीट येथील काही रेस्टॉरंट, कॅफे व सावजी भोजनालयात सर्रासपणे दारू उपलब्ध करून देण्यात येत आहे. पोलिसांच्या दुर्लक्षामुळे तेथील मालकांची हिंमत वाढली असून, तेथे अनेक समाजकंटक रात्री उशिरापर्यंत असतात.