चाकूचा धाक : पतसंस्थेची १२ लाखांची रोकड लुटली
By admin | Published: June 30, 2017 02:48 PM2017-06-30T14:48:23+5:302017-06-30T14:48:23+5:30
सहकारी पतसंस्थेची १२ लाखांची रोकड संचालकांच्या ताब्यातून भरदिवसा हिसकावून नेल्याची घटना गुरुवारी सायंकाळी पावणेपाच वाजता नागपुरातील कळमना भागात घडली
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सहकारी पतसंस्थेची १२ लाखांची रोकड संचालकांच्या ताब्यातून भरदिवसा हिसकावून नेल्याची घटना गुरुवारी सायंकाळी पावणेपाच वाजता नागपुरातील कळमना भागात घडली. या प्रकरणी पोलिसांनी रात्री गुन्हा दाखल केला. मात्र, १८ तासांपेक्षा जास्त कालावधी होऊनही पोलिसांच्या हाती अद्याप काही लागलेले नाही.
कळमन्याच्या डिप्टी सिग्नल परिसरात छत्तीसगड अर्बन क्रेडिट को-आॅपरेटीव्ह सोसायटी आहे. विपतराम रामप्रसाद मानकर (वय ७०) हे या सस्थेचे संचालक आहेत. संस्थेत जमा झालेली १२ लाखांची रोकड एका बॅगमध्ये ठेवून मानकर आणि त्यांच्या सुदर्शन नामक एका सहका-याने ती बॅग अॅक्टीव्हाच्या पायदानावर ठेवली. त्यानंतर ते कळमना मार्केटकडे गुरुवारी सायंकाळी ४.४५ वाजता निघाले. त्यांना ही रोकड सारस्वत बँकेच्या कळमना मार्केट शाखेत जमा करायची होती. चिखली पूल ते चिखली चौक या रस्त्यावर दयालू मौर्य कॉम्प्लेक्ससमोर अचानक एक पल्सर त्यांना आडवी आली. पल्सरवर बसलेल्या तीन आरोपींनी चाकूचा धाक दाखवून मानकर यांच्या ताब्यातील १२ लाखांची रोकड असलेली बॅग हिसकावून नेली. मानकर यांच्या तक्रारीनुसार केवळ दोन ते चार मिनिटात हा प्रकार घडला. मानकर आणि त्यांच्या सोबतच्या सुदर्शन नामक कर्मचा-याने आरडाओरड केली. मात्र, कुणाला काही कळेपर्यंत लुटारू पळून गेले होते. मानकर यांनी हा प्रकार आपल्या अन्य सहका-यांना कळविल्यानंतर सायंकाळी कळमना ठाण्यात धाव घेतली. कळमन्याचे पोलीस उपनिरीक्षक पी. रणदीवे यांनी आपल्या सहका-यांसह घटनास्थळ गाठले. अत्यंत वर्दळीच्या या भागात आजुबाजुच्यांना या घटनेविषयी आणि लुटारूंविषयी पोलिसांनी विचारपूस केली. मात्र, मध्यरात्रीपर्यंत या प्रकरणात कोणताच धागा पोलिसांच्या हाती लागला नाही. त्यामुळे नंतर या प्रकरणात लुटमारीचा पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
---
सीसीटीव्हीचा आधार
एक वृद्ध संचालक १२ लाखांसारखी मोठी रोकड कोणतीही सुरक्षा व्यवस्था सोबत न घेता दुचाकीने दीर्घ अंतरावर घेऊन जातो, हा प्रकार चर्चेचा विषय ठरला आहे. त्यामुळे या लुटमारीतील तथ्य तपासण्यासाठी पोलिसांना आता सीसीटीव्हीचा आधार घ्यावा लागत आहे. पत संस्थेतील आणि घटनास्थळापर्यंतच्या मार्गावरचे सर्व सीसीटीव्ही पोलीस तपासत आहे. त्यातून लुटमारीचा अन् आरोपीचा खुलासा होण्याची पोलिसांना आशा आहे.