सातव्या वेतन आयोगासाठी महामंडळातील अधिकारी-कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:09 AM2021-06-09T04:09:11+5:302021-06-09T04:09:11+5:30
नागपूर : राज्यातील विविध महामंडळातील संघटनांनी एकत्र येऊन सातव्या वेतन आयोगासाठी कृती समिती स्थापन केली आहे. या समितीने दोन ...
नागपूर : राज्यातील विविध महामंडळातील संघटनांनी एकत्र येऊन सातव्या वेतन आयोगासाठी कृती समिती स्थापन केली आहे. या समितीने दोन वर्षापूर्वी मे महिन्यात मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन महामंडळातील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याची विनंती केली होती. दोन वर्षांच्या पाठपुराव्यानंतरही हा प्रश्न निकाली न निघाल्याने पाच महामंडळातील सुमारे चार ते पाच हजार कर्मचारी व अधिकारी १६ जूनपासून काम बंद आंदोलन पुकारत आहेत.
कृती समितीने राज्य सरकारला संपाची नोटीस दिली असून, महामंडळातील सर्व कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून लक्षवेधी आंदोलन सुरू केले आहे. १५ जूनपर्यंत हे आंदोलन चालणार असून, यादरम्यान दखल न घेतल्यास बेमुदत काम बंद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
राज्यातील एकाच वेळेस महामंडळातील अधिकारी-कर्मचारी संपावर जात असल्यामुळे नागरिकांची अडचण होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांचा हंगाम सुरू असल्याने महाबीज व वखार महामंडळात अडचण निर्माण होणार आहे. वनविकास महामंडळातील ३ लाख ५० हजार वनक्षेत्रामधील वन्यजीव संरक्षण व संवर्धनाचे काम तसेच रोपवनाची कामे प्रभावित होण्याची शक्यता आहे.