गुन्हेगारांवर वार, एका दिवसात ९९ 'तडीपार'; नागपूर पोलिसांचा गुन्हेगारांवर जोरदार हंटर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2024 04:41 PM2024-11-13T16:41:40+5:302024-11-13T19:00:56+5:30
गुन्हेगारीमुक्त व पारदर्शक निवडणुकीसाठी पाऊल : विशेष मोहीम राबवत कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भयमुक्त वातावरणात गुन्हेगारीमुक्त व पारदर्शक निवडणूक पार पडावी यासाठी नागपूर पोलिसांनी शहरातील गुन्हेगारांवर जोरदार हंटर उगारला. विशेष मोहीम राबवत पोलिसांनी ९९ गुन्हेगारांवर एकाच दिवसात तडीपारीची कारवाई केली. हा नागपूर पोलिसांचा अनोखा विक्रमच ठरला असून यामुळे गुन्हेगारांमध्ये खळबळ उडाली आहे.
निवडणुकीच्या काळात गुन्हेगार सक्रिय होतात व राजकीय पक्षांच्या प्रचाराच्या माध्यमातून प्रभाव दाखविण्याचा प्रयत्न करतात. अनेक जण छुप्या पद्धतीने काम करत असतात. यामुळे गुन्हेगारीचा धोका तर असतोच, शिवाय निवडणूक भयमुक्त वातावरणात पार पाडणे अडचणीचे ठरते. या बाबी लक्षात घेऊन नागपूर पोलिस आयुक्त डॉ . रवींद्रकुमार सिंगल यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली व गुन्हेगारांविरोधात विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश दिले. त्याअंतर्गत सर्व पोलिस ठाण्यातील ९९ गुन्हेगारांचा वेगवेगळ्या कालावधीसाठी तडीपार करण्यात आले आहे. काही गुन्हेगार तडीपार झाल्यावर सीमेबाहेर जातात व काही दिवसांनी परत येतात. अशा गुन्हेगारांवर बारीक लक्ष ठेवण्याच्या पोलिस आयुक्तांनी सूचना दिल्या आहेत. जर एखादा गुन्हेगार तडीपार झाल्यावरदेखील शहरात फिरताना आढळला तर त्याच्यावर आणखी कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
अवैध शस्त्रांवर बारीक नजर
निवडणूक कालावधीत अवैध शस्त्रांवर पोलिसांची बारीक नज़र आहे. शस्त्रास्त्र कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या १२७ गुन्ह्यांमध्ये १२७ गुन्हेगारांना अटक करून त्यांच्याकडून शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. अमली पदार्थ तस्करीच्या ३९ गुन्ह्यांमध्ये ६४ आरोपींना अटक करण्यात आली असून १५.४८ लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. तंबाखू आणि गुटखा तस्करीच्या ३९ गुन्ह्यांमध्ये ६४ आरोपींना अटक करण्यात आली असून ३८ लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. या कालावधीत ४५.४६ लाख रुपयांची रोकडही जप्त करण्यात आली आहे.
पोलिसांची मतदानाबाबतदेखील जनजागृती
एकीकडे पोलिस गुन्हेगारांवर हेटर फिरवत असताना दुसरीकडे नागरिकांना २ मतदानासाठी प्रवृत्त करत आहेत. त्यांनी मतदानासाठी जनजागृती मोहीम सुरू केली आहे. त्याअंतर्गत पोलिस आयुक्तांच्या पुढाकाराने व चित्रकला महाविद्यालयाच्या सहकार्याने सिव्हिल लाइन्सच्या चिंटणवीस सेंटर येथे ९ ते १२ नोव्हेंबर या कालावधीत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये देशातील प्रसिद्ध चित्रकार सहभागी होत आहेत. नागरिकांनी मतदान करण्याचे आवाहन पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांनी केले आहे.
१,६७२ जणांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई
आदर्श आचारसंहिता लागू आल्यानंतर पोलिस कमालीचे सक्रिय झाले आहेत. विविध माध्यमांतून गुन्हेगारांची झाडाझडती घेण्यात येत आहे. आतापर्यंत १ हजार ६७२ जणांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे, तर ५२० जणांना अजामीनपात्र वॉरंट बजाविण्यात आले आहे. एमपीडीएअंतर्गत सात गुन्हेगारांची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. अवैध दारू विकण्यासंदर्भात ४९० गुन्हे दाखल करत ५२८ आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ११.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.