वाहतूक शाखेतर्फे नागपुरात धडाकेबाज मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2019 08:29 PM2019-03-02T20:29:22+5:302019-03-02T20:37:30+5:30

वाहतुकीला अडथळा निर्माण करून गुंडगिरी करणारे ऑटोचालक तसेच अन्य वाहनचालकांविरुद्ध लवकरच धडक कारवाई सुरू करून शहरातील बेशिस्त वाहतूक वळणावर आणली जाईल, अशी ग्वाही वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त नीलेश भरणे यांनी शनिवारी पत्रकारांना दिली.

Striking Traffic Campaign by Traffic branch in Nagpur | वाहतूक शाखेतर्फे नागपुरात धडाकेबाज मोहीम

वाहतूक शाखेतर्फे नागपुरात धडाकेबाज मोहीम

Next
ठळक मुद्देबेशिस्त ऑटो, बसचालकांविरुद्ध धडक कारवाईविस्कळीत वाहतूक वळणावर आणणार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वाहतुकीला अडथळा निर्माण करून गुंडगिरी करणारे ऑटोचालक तसेच अन्य वाहनचालकांविरुद्ध लवकरच धडक कारवाई सुरू करून शहरातील बेशिस्त वाहतूक वळणावर आणली जाईल, अशी ग्वाही वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त नीलेश भरणे यांनी शनिवारी पत्रकारांना दिली.
गेल्या आठवड्यात भरणे यांनी वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त म्हणून जबाबदारी स्वीकारली. त्यानंतर त्यांनी आज पत्रकारांसोबत शहरातील विस्कळीत वाहतूक आणि बेशिस्त वाहनचालकांची समस्या मार्गी लावण्याच्या संबंधाने चर्चा केली.
सिमेंट रोड आणि मेट्रोच्या कामामुळे शहरातील अनेक गर्दीच्या ठिकाणी वाहतुकीची वारंवार कोंडी होते. त्यामुळे नागरिकांची प्रचंड कुचंबणा होत आहे. त्यात बेशिस्त वाहनचालक आणि खासकरून ऑटोचालकांची गुंडगिरी टोकाला पोहचली आहे. ऑटोत बसविण्यासाठी ते ज्येष्ठ नागरिकांची अक्षरश: ओढाताण करतात. ऑटोत बसण्यास नकार दिल्यास टिंगलटवाळी करतात. रेल्वेस्थानक, बसस्थानक, कॉटन मार्केट आणि सीताबर्डी-धंतोलीत हा प्रकार सर्रास बघायला मिळतो. मध्यंतरी पोलिसांना मारण्याच्या आणि प्रवाशांना लुटण्याच्याही अनेक घटना घडल्या. कुठून, कसेही वाहन वळवून अन्य वाहनचालकांना, पायी चालणाऱ्यांना ऑटोचालक अडथळा निर्माण करतात, हे गैरप्रकार अनेक दिवसांपासून शहरात सुरू आहेत. त्याचा आपण अभ्यास केला असून, त्यांना वठणीवर आणण्यासाठी येत्या तीन ते चार दिवसात अ‍ॅक्शन प्लॅन राबविण्याची तयारी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या मुंजे चौकात मेट्रोच्या कामामुळे चार महिन्यांपासून वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. काम संपले तरी तेथे मोठ्या प्रमाणात कबाड पडले आहे. ते उचलून सीताबर्डी, धंतोलीतील वाहतूक सुरळीत करण्यासाठी अ‍ॅफ्कॉन आणि एनसीसीची आपण मदत घेणार आहोत. २४ तास काम करून ते सर्व तेथून हटविले जाणार आहे. पुढच्या तीन ते चार दिवसात हे सर्व पूर्ण करून वाहतूक सुरळीत केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
त्यासंबंधाने अ‍ॅफ्कॉनचे अधिकारी पै, विजय कुमार आणि वाहतूक शाखेचे निवृत्त सहायक पोलीस आयुक्त जमील अहमद यांच्याशी चर्चा करून वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. त्यासाठी ५० मार्शल (मनुष्यबळ) मागून घेण्यात आल्याचेही भरणे यांनी सांगितले. यावेळी वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भांडारकर हजर होते.
स्टार बस, ट्रॅव्हल्सचाही बंदोबस्त
शहरातील वाहतूक विस्कळीत करण्यात ट्रॅव्हल्सवाल्यांचीही महत्त्वाची भूमिका आहे. याशिवाय स्टार बसचे चालकही मनात येईल तिथे बस उभ्या करतात. या सर्वांवरच यापुढे कडक कारवाई केली जाईल, असे ते म्हणाले.
विद्यार्थी पालकांना त्रास होणार नाही
वाहतूक शाखेचे पोलीस वाहनचालकांसोबत खासकरून विद्यार्थ्यांसोबत अत्यंत उर्मटपणे वागतात, अशा सार्वत्रिक तक्रारी आहेत. सध्या परीक्षा सुरू आहेत. त्यामुळे विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांची लगबग असते. अनेकदा घाईगडबडीमुळे विद्यार्थी, पालक हेल्मेट, लायसेन्स वगैरे विसरतात. वाहतूक पोलीस त्यांना थांबवून विनाकारण त्रास देतात. त्यांचा वेळ वाया जाईल यावर पोलिसांचा भर असतो. या संबंधाने उजर केल्यास वाहतूक पोलीस उर्मटपणे वागतात. शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्याची धमकी देतात. हा प्रकार लक्षात आणून दिला असता, उपायुक्त भरणे यांनी त्याची गंभीर दखल घेतली. विद्यार्थी आणि पालकांना परीक्षा संपेपर्यंत त्रास होणार नाही, त्यांची तपासणी केली जाणार नाही, अशी हमी त्यांनी पत्रकारांना दिली. पोलिसांनी सौजन्याने वागावे यासाठी समुपदेशन वर्ग घेतले जातील, असेही त्यांनी सांगितले.

 

Web Title: Striking Traffic Campaign by Traffic branch in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.