पीओपी मूर्ती विक्रत्यांविरोधात कडक कारवाई : महापौरांनी बैठकीत दिले निर्देश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2019 11:14 PM2019-08-06T23:14:50+5:302019-08-06T23:16:34+5:30
महिनाभरातच गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे. पीओपी मूर्तीच्या विक्रीवर निर्बंध असले तरी अशा मूर्ती बाजारात विक्रीला असतातच. त्यामुळे जलसाठ्यांचे नुकसान होते. हा प्रकार थांबविण्यासाठी आणि मूर्तीची विक्री रोखण्यासाठी मनपा प्रशासनाने कठोर पावले उचलावीत, अशा सूचना महापौर नंदा जिचकार यांनी अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महिनाभरातच गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे. पीओपी मूर्तीच्या विक्रीवर निर्बंध असले तरी अशा मूर्ती बाजारात विक्रीला असतातच. त्यामुळे जलसाठ्यांचे नुकसान होते. हा प्रकार थांबविण्यासाठी आणि मूर्तीची विक्री रोखण्यासाठी मनपा प्रशासनाने कठोर पावले उचलावीत, अशा सूचना महापौर नंदा जिचकार यांनी अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिल्या.
या बैठकीला आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा, विरोधी पक्षनेता तानाजी वनवे, प्रतोद दिव्या धुरडे, आरोग्य समिती उपसभापती नागेश सहारे, रूपा रॉय, सुनील अग्रवाल, अपर आयुक्त राम जोशी, अजीज शेख, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. सुनील कांबळे, अतिरिक्त सहायक आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, ग्रीन व्हिजिल फाऊंडेशनचे संस्थापक कौस्तुभ चटर्जी, सुरभी जैस्वाल आदी उपस्थित होते.
यासंदर्भात यंत्रणेला निर्देश देताना महापौर म्हणाल्या, पीओपीच्या मूर्तींवर विक्रेत्यांनी लाल रंगाची खूण करणे आवश्यक आहे. असे न करणाऱ्या विक्रेत्यांवर कडक कारवाई केली जाईल. मागील वर्षी ज्याप्रकारे सोनेगाव, गांधीसागर, सक्करदरा, अंबाझरी तलावामध्ये पीओपी मूर्तींचे विसर्जन झाले नाही तशीच सतर्कता यावर्षी नाईक तलावाच्याबाबतीत पाळा. पीओपी मूर्तींचेविसर्जन कृत्रिम तलावातच होईल, याकडे कटाक्षाने लक्ष द्यावे. नागरिकांनाही त्यासाठी आवाहन करावे. शहरातील भागांमध्ये कृत्रिम टँक लावले जावेत, अशीही सूचना त्यांनी केली.
वीरेंद्र कुकरेजा म्हणाले, गणेश विसर्जनासाठी रबरी टँकचा वापर केला जातो. मात्र ते काही दिवसातच खराब होतात. दरवर्षी नवीन खरेदी करावी लागते. त्यामुळे रबरी टाक्यांएवजी सेंट्रिंगचे टाके तयार करण्यात यावेत. विसर्जनस्थळी मोठ्या प्रमाणावर उजेडाची व्यवस्था केली जावी. उत्सवाच्या आधीच विसर्जन मार्ग दुरुस्त करण्याचे काम हाती घ्यावे, कृत्रिम टाक्यांच्या निधीसाठी जिल्हा नियोजन समितीकडून प्रस्ताव तयार करावे, अशी सूचना त्यांनी मांडली.
वर्ष कृत्रिम तलाव निर्माल्य मूर्तीं विसर्जन
२०१६ २०० १४७ १,७८,७०१
२०१७ २३४ १५२ २,०७,०११
२०१८ २६० १६३ २,३१,५०१
विसर्जनासाठी पिण्याचे पाणी वापरण्यावर बंदी
पाण्याची समस्या लक्षात घेता विविध संघटनांनी पिण्याच्या पाण्याचा उपयोग विसर्जनासाठी करण्यास मनाई करण्याची सूचना मांडली. ही मागणी महापौरांनी मान्य करून संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. विसर्जनादरम्यान संकलित होणारे निर्माल्य सुगंधित अगरबत्ती तयार करणाऱ्यांना नि:शुल्क देण्याची सूचना केली.