नागपुरातील कोराडी नवरात्रोत्सवासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 08:35 PM2018-09-17T20:35:04+5:302018-09-17T20:37:19+5:30

येत्या १० आॅक्टोबरपासून सुरू होणाऱ्या अश्विन नवरात्रासाठी श्री महालक्ष्मी जगदंबा देवी संस्थान कोराडी नवरात्रोत्सवाची तयारी जोरात सुरू असून नवरात्रोत्सवात सहभागी होणाऱ्या सुमारे १० ते १५ लाख भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता पोलीस बंदोबस्त चोख राहणार आहे. नवरात्रोत्सवादरम्यान मंदिर परिसरातील सर्व हालचालींवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे. सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तयारीचा आढावा घेतला.

A strong bandobast of police for the Koradi Navaratra festival in Nagpur | नागपुरातील कोराडी नवरात्रोत्सवासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त

नागपुरातील कोराडी नवरात्रोत्सवासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त

Next
ठळक मुद्देसीसीटीव्ही कॅमेऱ्यांची सर्व हालचालींवर नजर : पालकमंत्र्यांनी घेतला आढावा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : येत्या १० आॅक्टोबरपासून सुरू होणाऱ्या अश्विन नवरात्रासाठी श्री महालक्ष्मी जगदंबा देवी संस्थान कोराडी नवरात्रोत्सवाची तयारी जोरात सुरू असून नवरात्रोत्सवात सहभागी होणाऱ्या सुमारे १० ते १५ लाख भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता पोलीस बंदोबस्त चोख राहणार आहे. नवरात्रोत्सवादरम्यान मंदिर परिसरातील सर्व हालचालींवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे. सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तयारीचा आढावा घेतला.
या बैठकीला आ. मल्लिकार्जुन रेड्डी, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, जि.प. सीईओ यादव, पोलीस अधीक्षक व अन्य पोलीस अधिकारी, मंदिर संस्थानचे अध्यक्ष डॉ. मुकेश शर्मा, सचिव फुलझेले व अन्य विश्वस्त उपस्थित होते.
पोलीस मंदिर व्यवस्थापन, ग्रामपंचायत कोराडी, महावितरण, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, तहसील कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, नासुप्र आदी सर्व विभागांचे संबंधित अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. ज्या विभागाकडे जी जबाबदारी आहे, त्या विभागाने करावयाची कामे व सध्या सुरू असलेल्या कामांचा आढावा पालकमंत्र्यांनी घेतला. सुरक्षिततेच्या दृष्टीने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. २४ तास हा बंदोबस्त राहणार आहे. गर्दीच्या ठिकाणापासून मंदिरापर्यंत आणि अन्य ठिकाणी बॅरिकेटिंग व मंडप लावले जाणार आहेत. या नवरात्रोत्सवात काम करणाऱ्या स्वयंसेवकांच्या नेमणुकीबाबत मंदिर व्यवस्थापन व पोलिस विभागाशी चर्चा करण्यात आली. छिंदवाडा रोड ते देवी मंदिर कोराडी रोड येथे तसेच नांदा खापरखेडा वाहतूक पोस्ट लावण्यात येणार आहे. या संदर्भात एसीपी वाहतूक यांना निर्देश देण्यात आले. वाहतूक नियोजनाचा आराखडा पोलिस प्रशासन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करणार आहे. सुरक्षित वाहतुकीसाठी आवश्यक असलेले अतिक्रमण हटविण्यात येईल. मंदिर गाभाऱ्यात दर्शन करताना महिला व पुरुषांच्या स्वतंत्र रांगा राहतील. तसेच या रांगांवर सीसीटीव्हीची नजर असेल. याशिवाय मेटल डिटेक्टरमधून भाविकांना प्रवेश घ्यावा लागेल.
विद्युत व्यवस्थेसाठी दोनजनरेटर कायम राहणार आहे. नवरात्रादरम्यान वीजपुरवठा खंडित होऊ नये याची पुरेशी काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. नांदाफाटा ते खापरखेडा, मंदिर ते सुरादेवी व मुख्य रस्ता ते मंदिर या मार्गावर पुरेशी पथदिव्यांची व्यवस्था करण्यात येणार आहे. मंदिर परिसरात विविध ठिकाणी विद्युत टॉवर, लॅडरची व्यवस्था करण्यात येईल. तसेच रस्त्यावरील अतिक्रमण, झाडे झुडपे काढण्याच्या सूचनाही करण्यात आल्या.
नवरात्रादरम्यान सुसज्ज अग्निशमन वाहने उपलब्ध करण्याची जबाबदारी महानिर्मिती कोराडी व खापरखेडा यांच्याकडे आहेत. याशिवाय मुख्याधिकारी कामठी, महादुला नगरपंचायत हेही अग्निशमन वाहनांची व्यवस्था करणार आहेत. आरोग्य विभागातर्फे मंदिर परिसरात २४ तास आरोग्य सेवा केंद्रे उभारण्यात येतील. डॉक्टर, नर्स व औषधांची व्यवस्था येथे करण्यात येईल. स्वच्छता व साफसफाईची २४ तास व्यवस्था राहणार आहे. ग्रामपंचायत कोराडी, मंदिर व्यवस्थापन व सुलभ इंटरनॅशनल संस्था साफसफाईची व्यवस्था करणार आहे. चार स्थायी सुलभ शौचालय व पाच तात्पुरते सुलभ शौचालयांची व्यवस्था राहणार आहे. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ठिकठिकाणी नि:शुल्क करण्यात येणार आहे. पिण्याच्या पाण्याच्या पाऊचवर प्रतिबंध घालण्यात येईल. नारळ फोडण्याची व्यवस्था अन्य ठिकाणी राहील. जमा होणाऱ्या सर्व कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची व्यवस्था करण्यासाठी कंपोस्ट खड्डे तयार करण्यात येऊन त्यात कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात येईल.

कोराडीसाठी बसच्या ४०० फेऱ्या
भाविकांसाठ़ी नागपूर, कामठी, सावनेर, हिंगणा, उमरेड रोड रामटेक रोड या सर्व भागातून बसची व्यवस्था राहणार आहे. गेल्या वर्षी स्टार बसच्या २५ बसने ३१० फेºया झाल्या होत्या. यंदा ३० बसच्या ४०० फेºया उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

मंदिरापासून १०० मीटर वाहनाला ‘नो एंट्री’
मंदिरापासून १०० मीटर परिघामध्ये कोणत्याही वाहनाला प्रवेश मिळणार नाही. दुचाकी वाहनांसाठी सेवानंद विद्यालयाचे प्रांगण आणि चार चाकी वाहनांसाठ़ी खापरखेडा रोडकडील मैदानावर ग्रामपंचायत कोराडीने पार्किंगचे नियोजन करावे. पार्किंगच्या ठिकाणी बॅरिकेटिंग, जागेचे सपाटीकरण, रेटबोर्ड, टॉवर लाईट, पाण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या. पोलीस विभाग, ग्रामपंचायत आणि महसूल विभागाने मदत केंद्रे उभारण्याची सूचना करण्यात आली. तसेच नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन केंद्रही उभारले जाणार आहे. मंदिर परिसरात सिलेंडरचा साठा करता येणार नाही. डोमॅस्टिक सिलेंडरचा वापर प्रतिबंधित राहील. पुरवठा विभागाने याबाबतची तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले.

 

Web Title: A strong bandobast of police for the Koradi Navaratra festival in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.