हप्ता वसुलीवरून जोरदार मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:07 AM2021-08-01T04:07:20+5:302021-08-01T04:07:20+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : खासगी बँकेतून घेतलेल्या वाहन कर्जाचे हप्ते थकल्यामुळे निर्माण झालेल्या वादातून वसुली करण्यासाठी आलेल्यावर एकाने ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : खासगी बँकेतून घेतलेल्या वाहन कर्जाचे हप्ते थकल्यामुळे निर्माण झालेल्या वादातून वसुली करण्यासाठी आलेल्यावर एकाने हल्ला चढवला. गुरुवारी दुपारी सक्करदऱ्यात ही घटना घडली. यात शहजाद शेख अब्दुल सलीम शेख (वय २३, रा. आदर्शनगर) हा तरुण जबर जखमी झाला.
मोठा ताजबाग सरताज कॉलनीत राहणारा अब्दुल शाहिद शेख (वय २५) याने दुचाकीसाठी खासगी बँकेतून कर्ज घेतले होते. लॉकडाऊनमुळे त्याला कर्जाचे हप्ते भरणे शक्य झाले नाही. त्यामुळे थकीत रक्कम वसूल करण्यासाठी शहजाद गुरुवारी दुपारी शेख शाहिदच्या घरी पोहोचला. त्याने थकीत रकमेची मागणी केली. ती देण्यास असमर्थता दर्शविल्याने शहजादने दुचाकी जप्त करावी लागेल, असे म्हटले. त्यावरून शाहिद चिडला. त्यांच्यात बाचाबाची झाली. त्यानंतर शाहिदने लोखंडी रॉडने शहजादवर हल्ला चढवला. शहजादच्या डोक्याला आणि खांद्याला जबर दुखापत झाली. आजूबाजूची मंडळी धावली आणि त्यांनी शाहिदला आवरले. उपचार घेतल्यानंतर शहजादने या प्रकरणाची तक्रार सक्करदरा पोलिसांकडे नोंदवली. त्यावरून पोलिसांनी शुक्रवारी गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.
---