नागपूरच्या सीपी क्लबमध्ये जोरदार हाणामारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2018 09:31 PM2018-11-08T21:31:28+5:302018-11-08T21:34:35+5:30
शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांचा राबता असलेल्या सिव्हिल लाईनमधील सीपी क्लबमध्ये मंगळवारी मध्यरात्री जोरदार हाणामारी झाली. यात एका व्यापाऱ्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून अत्यंत सुरक्षित व प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या सीपी क्लबमध्ये ही हिंसक घटना घडल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांचा राबता असलेल्या सिव्हिल लाईनमधील सीपी क्लबमध्ये मंगळवारी मध्यरात्री जोरदार हाणामारी झाली. यात एका व्यापाऱ्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून अत्यंत सुरक्षित व प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या सीपी क्लबमध्ये ही हिंसक घटना घडल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.
शहरातील व्यापारी बांधवांपैकी काहींनी मंगळवारी रात्री दिवाळी मिलनाची पार्टी आयोजित केली होती. या पार्टीत सदरमधील फर्निचर व्यापारी ब्रजेश सुशील खेमका हे देखील आपल्या मित्रांसह सहभागी झाले होते. मध्यरात्रीनंतर सुमारे १ च्या दरम्यान खेमका बाथरूमला जात असताना त्यांना काही तरुणांमध्ये वाद होताना दिसला. खेमका यांनी ओळखीची मंडळी दिसल्यामुळे त्यांना वादाचे कारण विचारून समेट करण्याचा प्रयत्न केला. यावरून त्यांच्यासोबत जसप्रीत तुली नामक तरुणाची बाचाबाची झाली. वाद टाळण्यासाठी सुमीत नामक मित्राने खेमका यांना तेथून सोबत नेले. दरम्यान, ते पोर्चमध्ये आपल्या मित्रांची वाट बघत असताना जसप्रीत आणि त्याचे काही मित्र तेथे आले. त्यांनी पुन्हा खेमकासोबत वाद घातला. धक्काबुक्कीत खेमका यांचा जसप्रीतच्या पगडीला धक्का लागला. ते कारण पुढे करून जसप्रीतने तेथील काचेचे ग्लास उचलले आणि खेमकाच्या डोक्यावर मारले. परिणामी खेमका यांना गंभीर दुखापत झाली. ते पाहून खेमकांचे मित्र मदतीला धावले असता आरोपी जसप्रीत आणि त्याचे मित्र शिवीगाळ करून धमकी देत पळून गेले. दिवाळी मिलनाच्या कार्यक्रमात व्यापाऱ्यांची अशा प्रकारे दिवाळी पहाट झाल्याने शहरात खळबळ उडाली. खेमका यांना एका खासगी इस्पितळात नेण्यात आले. तेथे त्यांच्यावर उपचार करून घेतल्यानंतर सदर पोलिसांकडे तक्रार नोंदवण्यात आली. पोलिसांनी वैद्यकीय अहवालावरून आरोपी जसप्रीत तसेच साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला. दरम्यान, आरोपींना अटक करण्याची मागणी व्यापाºयांनी लावून धरली. हे प्रकरण वरिष्ठांकडेही गेले. सदरचे ठाणेदार सुनील बोंडे यांनी गुरुवारी सीपी क्लबमधील सीसीटीव्ही फुटेज जप्त केले. वृत्त लिहिस्तोवर या प्रकरणात कुणालाही अटक झालेली नव्हती.