सहायक आयुक्तांना झालेल्या मारहाणीचा निषेध करण्यासाठी कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून काम
By आनंद डेकाटे | Published: July 6, 2024 05:01 PM2024-07-06T17:01:03+5:302024-07-06T17:05:11+5:30
सामाजिक न्याय विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून काम : काम बंदचा इशारा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : समाजकल्याण विभागातील हिंगोलीचे सहायक आयुक्त यादव गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा राज्यभरात तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. राज्यभरातील सामाजिक न्याय विभागातील सर्व जिल्ह्यांमधील कार्यालयांमध्ये अधिकारी कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून काम करीत या घटनेचा निषेध नोंदवला आहे. तसेच आरोपींना तातडीने अटक न झाल्यास काम बंद आंदोलनाचा इशाराही दिला आहे.
हिंगोलीचे सहायक आयुक्त यादव गायकवाड यांच्या गेल्या गुरूवारी काही अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या घरात घुसून हल्ला केला. त्यांना शिविगाळ करीत मारहाण केली. या घटनेमुळे अधिकाऱ्यांमध्ये भितीदायक वातावरण पसरले आहे. सामाजिक न्याय विभाग राजपत्रित अधिकारी संघटनेने या हल्ल्याच्या निषेध करीत आरोपींवर तातडीने गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी केली आहे. संघटनेने या हल्ल्याच्या निषेधार्थ आंदोलनाची हाक देत आरोपींना अटक होत नाही, तोपर्यंत राज्यातील सर्व समाजकल्याण विभागातील अधिकारी कर्मचारी काळ्या फिती लावून काम करणार आहेत. संघटनेच्यावतीने यासंदर्भात विभागाच्या सचिवांना पत्रही लिहिण्यात आले आहे.
नागपूर येथे समाजकल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त डॉ. सिद्धार्थ गायकवाड, सहायक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे, उपायुक्त मंगेश वानखेडे यांच्या नेतृत्वात सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी काळ्या फित लावून काम केले.